

जेएनपीए : विठ्ठल ममताबादे
कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा वादळाचं संकट घोंघावतंय! खवळलेल्या समुद्रात खोलवर गेलेल्या न्हावा शेवा येथील मासेमारी बोटींपैकी तीन बोटी अजूनही बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कोस्ट गार्डकडून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मत्स्यविभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिली आहे.
याबाबत खलाशी आजही अनेक बोटी बेपत्ता असल्याचे सांगत आहेत. त्यांचा आरोप असा की सदर बोटी जनरेटर व एलईडी लावून बेकायदेशीर मासेमारी करत होत्या आणि याला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद होता. त्यामुळे आता आपले बिंग फुटू नये म्हणूनच अधिकारी माहिती लपवत आहेत, असा आरोप खलाशी वर्ग करीत आहे.
नारळी पौर्णिमेनंतर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मासेमारी हंगामाची सुरुवात झाली असली, तरी कमी दाबाचा पट्टा, प्रचंड वारे आणि उंच लाटा यामुळे समुद्र प्रचंड खवळला आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील मोरा व करंजा बंदरावर गुजरातसह शेकडो बोटी उभ्या करण्यात आल्या आहेत. तरी काही बोटी समुद्रात गेल्या आणि आता त्यांचा थांगपत्ता लागत नाही.
खलाशी वर्ग सांगतो, अशी भयानक परिस्थिती आम्ही कधीच पाहिली नव्हती! तीन-चार वेळा समुद्र खवळल्याने बोटी उभ्या केल्या, पण खोल समुद्रात गेलेल्या बोटींचं काहीही चिन्ह दिसत नाही.
शासनाने बंदी घातलेल्या जनरेटर आणि एलईडी लावून मासेमारीचे प्रकार खुलेआम सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. लाखोंच्या या साटेलोटीतूनच आजचे हे जीवघेणे दिवस निर्माण झालेत, असा संताप मच्छीमारांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर बेपत्ता बोटींचा शोध सुरू असून, समुद्रकिनाऱ्यालगत तातडीने शोधमोहीम राबवली जात आहे. या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी! बेपत्ता बोटींतील खलाशांचा शोध तातडीने घेण्यात यावा आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खलाशांकडून केली जात आहे.
याबाबत उरण परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे यांच्याकडे व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उरण परिसरातील पाचही बोटी सुखरूप परत आल्याची माहिती दिली, तर ससून डॉकवरील तीन बोटी अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले.
आज समुद्रात बोटींना नाही, तर प्रशासनाच्या जबाबदारीलाच जलसमाधी मिळाल्यासारखं दिसतंय! शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सत्य बाहेर आणावं अशी जनतेची मागणी आहे. या सर्व गोष्टीची चौकशी केल्यास सत्य काय आहे हे सर्वांना नक्की कळेल अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात आलेल्या मिथा वादळामुळे मच्छिमार करणाऱ्या कोळी लोकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेक खलाशी अजूनही आपल्या गावी परतले नसल्याने त्यांचे कुटुंब मोठया चिंतेत आहेत.
बोटींची माहिती देण्यास टाळाटाळ?
आजच्या घडीला मासेमारी करणाऱ्या अनेक बोटी या पारंपरिक पद्धतीने न करता बंदी असलेल्या जनरेटर व एलईडी लावून खुलेआम मासेमारी करत आहेत. अधिकारी बेपत्ता बोटींची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा मच्छीमार बांधवांत सुरू आहे. ते आपल्याला माहिती नसल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकत असल्याने अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची उचलबांगडी करण्याची मागणी पारंपरिक मच्छीमार बांधवांकडून होत आहे.