

नेरळ : आनंद सकपाळ
गोव्याहून गुजरातकडे पुष्पा सिनेमातील एका दृष्याप्रमाणे टँकर मधून मोठया प्रमाणात विदेशी मद्यसाठ्याची अवैधरीत्या तस्करी करणाऱ्या टँकरवर धाड टाकून एक कोटींचा मद्यसाठा जप्त केला आहे.
गोव्याहून गुजरातकडे अवैधरीत्या मद्यसाठ्याची तस्करी होणार असल्याची खबर रायगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिसांनी संयुक्तरीत्या कर्जत- मुरबाड- शहापूर या राज्य महामार्गावर शनिवारी (21 मार्च ) सापळा रचला.
रात्रीचे सव्वा अकराच्या सुमारास वाहनांची तपासणी सुरु असताना वारे गावचे हद्दीतील कोकण किनारा हॉटेलच्या समोर खियाराम बिष्णोइ हा टँकरमधून गोवा बनावटीची विदेशी मद्यची विनापरवाना गोवा ते गुजरात अशी वाहतूक करत असल्याचा संशय आला. नेरळ पोलिसांनी सदर टँकरची पाहणी केली असत त्यात गोवा विदेशी बनावटीचा मद्यसाठा आढळून आला.या टँकरसह विदेशी बनावटीचा मद्यसाठा जप्त करत, टँकरचालकाला अटक करण्यात आली.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे, पोलीस उपनिरीक्षक किसवे, पिंगळे, गुजराथी, लावरे, खंडागळे, वाघमारे, गर्जे, केकाण, बेंद्रे, पिसाट, वांगणेकर, कनके, डाखोरे,काळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. नेरळ पोलिसांनी संयुक्तरीत्या कर्जत- मुरबाड- शहापूर या राज्य महामार्गावर शनिवारी (21 मार्च ) सापळा रचला होता.
टँकरच्या आतमध्ये असलेल्या 5 कप्प्यांमधील एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की या कंपनीची विदेशी दारूच्या 750 मि.ली लीटरच्या 430 बॉक्समध्ये 5160 बाटल्या एकूण किमत 41 लाख 28 हजार रुपये, मोबी वोडका ऑरेंज या कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे एकूण 179 बॉक्स व त्यामध्ये 2141 बाटल्या एकूण किमत 15 लाख 3 हजार 600 रुयपे, मोबी वोडका हिरवे सफरचंद या कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे एकूण 190 बॉक्स त्यामध्ये 2280 बाटल्या एकूण किमत 15 लाख 96 हजार रूपये असा एकूण 1 कोटी 1 लाख 27 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.