

नेरळ : खांडा प्रभागातील नेरळ - ममदापूर, भडवळ या मुख्य रस्त्याच्या कडेला नेरळ ग्रामपंचायतीने निधी खर्च करून बांधलेली कचराकुंडी ही तेथे असलेल्या पाणीपुरीवाल्याच्या स्वार्थापोटी नेरळ ग्रामपंचायतीचा राजीनामा दिलेले माजी सदस्याने कंत्राटी कामगार घेवून तोडून टाकली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत योग्य कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा शहराध्यक्ष सुभाष नाईक यांनी दिला आहे.
नेरळ गावातील प्रभागांमध्ये सिमेंट विटांचे बांधकाम करून कचरा कुंड्या या बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी खांडा गावातील कचरा कुंडी ही राजीनामा दिलेले माजी सदस्य हे आपल्या कंत्राटी कामगार यांना सोबत घेऊन तोडत असल्याने, निदर्शनास आले.याबाबत मनसेचे शहर उपाध्यक्ष सुभाष नाईक यांनी कचराकुंडी कशासाठी तोडली जात आहे, अशी विचारणा केली असता नव्याने बांधण्यासाठी तोडली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र खांडा प्रभागातील नेरळ - ममदापूर - भडवळ या मुख्य रस्त्याच्या कडेला नेरळ ग्रामपंचायतीने आर्थिक निधी खर्च करून बांधलेली कचराकुंडी ही तेथील असलेल्या पाणीपुरीवाल्याच्या स्वार्थापोटी की खुश करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय करून माजी सदस्याने कंत्राटी कामगार घेवून तोडून टाकली आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पुढील आठ दिवसात त्याच ठिकाणी नव्याने कचराकुंडी बांधण्यात यावी आणि नवीन कचराकुंडी बांधण्यासाठी आलेला खर्च हा चांगल्या स्थितीत असलेली कचराकुंडी तोडण्यासाठी कामगार लावणार्या माजी सदस्यांकडून वसूल करून, नेरळ ग्रामपंचायतीने आर्थिक निधी खर्च करून बांधलेली कचराकुंडी त्याच ठिकाणी उभारली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा नेरळ ग्रामपंचायतीला निवेदनाच्या माध्यमातून मनसेचे नेरळ शहर उपाध्यक्ष तथा स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी इशारा दिला आहे.