

रायगड: रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या जागावाटपाचा आणि स्थानिक नेतृत्वाचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आज दिलजमाई झाली असून, रायगड पालकमंत्रीपद शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे तर विधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना असा सामोपचाराचा फॉर्म्युला ठरला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांची देखील उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा झाली. त्यानंतरच फॉर्म्यूला ठरला.
आज आम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख व उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठकीस गेलो होता. त्या बैठकीत सामोपचाराचा नवा फॉर्म्यूला ठरला आहे. त्यानुसार रायगडचे पालकमंत्री पद आपल्याकडे तर विधानपरिषदेची उमेदवारी अनिकेत तटकरे यांना देण्यात आल्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगीतले. राजकारणात तडजोडी होत असतात.
वरिष्ठ नेत्याच्या स्तरावर सामोपचाराने निर्णय घेतले जातात, अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या सुईली दळवी-जुवेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन आमचा तटकरे यांना विरोध असल्याचे शनिवारी बोलताना सांगीतले होते. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र दळवी यांना विचारले असता, आजच्या बैठकीत ज्युईली दळवी-जुवेकर आणि अनिकेत तटकरे या दोघांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगीतले आहे.
4 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज कोणी मागे घ्यायचा याचा निर्णय होईल. आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण हे स्पष्ट होईल, असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगीतले.
रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष मिटवून आगामी निवडणुकांमध्ये एकजूट राखण्यासाठी भाजपकडून मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात येत होता, त्यास यश आले असून रायगडमधील शिवसैनिकांची रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेकडे द्यावे, अशी प्रदीर्घ काळाची मागणी या निमीत्ताने पूर्ण होत असल्याने शिवसेनेत तर विधानपरिषदेची उमेदवारी अनिकेत तटकरे यांना निश्चित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.