

खांदा कॉलनी : नवी मुंबईच्या पामबीच मार्गालगत असलेल्या खाडी परिसरातील कांदळवने वरून हिरवीगार दिसत असली, तरी त्यांच्या आतमध्ये कचऱ्याचे भयावह साम्राज्य पसरले आहे. वैद्यकीय कचरा, प्लास्टिक, कॉस्मेटिक वेस्ट, एफएमसीजी कंपन्यांच्या उत्पादनांचे अवशेष आणि थर्माकोल यामुळे कांदळवनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. समुद्रकिनारे आणि खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर साचणारा हा कचरा केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर सागरी जीवसृष्टी आणि स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेसाठीही गंभीर समस्या बनत आहे.
एन्व्हायर्नमेंट लाईफ फाउंडेशनचे संस्थापक आणि जलशक्ती मंत्रालयाचे वॉटर हिरो धर्मेश बरई यांनी या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट २०२० पासून दर रविवारी अखंडपणे कांदळवन आणि सागरी किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या सहा वर्षांत या मोहिमेतून तब्बल १,४०० टनांपेक्षा अधिक कचरा समुद्रकिनारे आणि कांदळवन परिसरातून हटविण्यात आला आहे. या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी, कॉर्पोरेट कंपन्यांचे कर्मचारी आणि हजारो पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले आहेत. सुमारे दीड लाख नागरिक या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीशी जोडले गेले आहेत.
कांदळवनांच्या मुळांपर्यंत पोहोचला कचरा
खाडी परिसरात साचणाऱ्या कचऱ्याचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः वैद्यकीय साहित्य, औषधांचे अवशेष, कॉस्मेटिक वेस्ट, प्लास्टिक पिशव्या आणि एफएमसीजी उत्पादनांचे पॅकेजिंग मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. नेरूळ येथील जेट्टीजवळील कांदळवन परिसरात विनालेबल गोण्यांमध्ये सडलेला वैद्यकीय कचरा आढळून आल्याने चिंता अधिक वाढली आहे. काही ठिकाणी कचऱ्यामुळे कांदळवनांची मुळे पूर्णपणे झाकली गेली असून, काही भागांत तर कांदळवनांची मुळेही दिसेनाशी झाली आहेत. दूरून हिरवागार दिसणाऱ्या या परिसराची प्रत्यक्ष स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे बरई यांनी सांगितले.
नाल्यांमधून वाहून येणारे रासायनिक घटक आणि घनकचरा समुद्रात मिसळत असल्याने सागरी पर्यावरणावर परिणाम होत आहे. याचा फटका मासे आणि इतर सागरी जीवांना बसण्याची भीती आहे. दूषित सागरी अन्नसाखळीमुळे मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावरही त्याचे परिणाम होत आहेत.
कचरा समुद्रात जाण्याआधीच रोखण्याची गरज
केवळ नालेसफाई करून प्रश्न सुटणार नाही, तर शहरातून नाल्यांमध्ये जाणारा कचरा त्याच्या उगमस्थानीच रोखणे आवश्यक आहे. कचरा टाकण्याचे हॉटस्पॉट निश्चित करून तेथे कठोर नियमांची अंमलबजावणी करावी. महापालिका आयुक्त, महापौर आणि संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांनी खाडी व पाणथळ क्षेत्रांमध्ये कचरा जाणार नाही, यासाठी नियमित देखरेख ठेवावी. वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत वैद्यकीय संस्थांवर कठोर नियंत्रण ठेवावे. तसेच प्लास्टिक पॅकेजिंग करणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांना रिव्हर्स लॉजिस्टिक्सची जबाबदारी बंधनकारक करावी, अशा मागण्या बरई यांनी केल्या आहेत.
'शहरातून येणारा कचरा थांबवला तरच समुद्र सुरक्षित'
'गेल्या सहा वर्षांत आम्ही सातत्याने स्वच्छता मोहीम राबवून सुमारे १,४०० टन कचरा समुद्रकिनारे आणि कांदळवनातून बाहेर काढला आहे. मात्र, दर आठवड्याला पुन्हा मोठ्या प्रमाणात कचरा येत आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे की, सरकार आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शहरांमधून नाले आणि खाड्यांमध्ये येणारा कचरा आधीच थांबवला पाहिजे. तरच मुंबई महानगर प्रदेशातील खाड्या, समुद्र आणि सागरी किनारपट्टी स्वच्छ व सुरक्षित राहू शकेल. अन्यथा अरबी समुद्र स्वच्छ करण्याचे आणि ब्ल्यू सागराचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे कठीण होईल,' असे धर्मेश बरई यांनी सांगितले.