

Navi Mumbai Airport Opening Date
पनवेल : देशातील सर्वात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हे भव्य विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी शनिवारी या विमानतळाची पाहणी केली आणि माध्यमांशी संवाद साधताना या विमानतळावर उपलब्ध होणाऱ्या सुविधा व कनेक्टिव्हिटीविषयी महत्त्वाची माहिती दिली.
या विमानतळाच्या भौतिक कामांची प्रगती सध्या ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. विशेष म्हणजे, विमानतळाचा छताचा भाग (सेसिलिंग) आणि अंतिम टप्प्यातील अंतर्गत डिझाईनचे काम प्रगतीपथावर आहे. एकदा पूर्ण झाले की हे विमानतळ देशातलेच नव्हे तर आशियातील एक महत्त्वाचे हवाईदालन ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळ हे केवळ एक प्रवासाचे ठिकाण न राहता, हे ‘फ्युचर रेडी’ एअरपोर्ट असेल. इथे प्रवाशांना बॅगेज ट्रॅकिंगसाठी ३६० डिग्री बारकोड स्कॅनिंगची सुविधा असेल. जगातील सर्वात वेगाने प्रवास करणाऱ्या बॅगेज सिस्टीमपैकी एक याठिकाणी कार्यान्वित केली जाणार आहे. विमानतळावर एक किमीपर्यंत चालण्याऐवजी ‘ट्रॅव्हलर’ सुविधा (ऑटोमेटेड वॉकवे) देण्यात येणार आहे, जेणेकरून वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना कोणतीही अडचण भासणार नाही.
या विमानतळावर पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतील. अंडरग्राउंड मेट्रो ट्रेनची सुविधा दिली जाणार असून त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर थेट पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. याशिवाय जलमार्गाद्वारे ‘वॉटर टॅक्सी’ची सेवा देखील कार्यान्वित केली जाणार आहे. हा भारतातील काही मोजक्या शहरांत उपलब्ध असलेला सुविधा पर्याय ठरणार आहे.नवी मुंबई, ठाणे, पनवेल, खोपोली, कल्याण या परिसरातील नागरिकांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मार्गिका व विशेष कनेक्टिव्हिटी नेटवर्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या विमानतळाच्या दोन रनवे पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर वर्षाला तब्बल ९ कोटी प्रवाशांसाठी सेवा देता येणार आहेत. मुंबई विमानतळाच्या तुलनेत हे विमानतळ अधिक विस्तृत आणि आधुनिक असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विमानतळाचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांच्या वेळापत्रकाची मागणी करण्यात आली आहे.
या भव्य प्रकल्पाच्या उभारणीत दररोज १३ ते १४ हजार कामगार झटत असून, ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. अशा प्रकारे एक नवे आधुनिक भारताचे प्रवेशद्वार उभे राहत असून, महाराष्ट्राच्या औद्योगिक व पर्यटन विकासाला गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.