

नेरळ ः माथेरान डोंगरदरीत वसलेल्या व उरण तालुक्यात समाविष्ट असलेल्या खोंडा या आदिवासी गावाकडे माथेरान मधून जाणारी पायवाट ही मुसळधार पडणार्या पावसात झालेल्या भूसंकलनामुळे लुप्त पावली आहे. तर माथेरानमधून डोंगरदरीतून खाली उतरण्यासाठी असलेल्या लोखंडी शिडीची अक्षम्य दुरावस्था झाली आहे. तर खोंडा गावातील आदिवासी बांधवांची उपजीविका ही संपूर्णपणे माथेरानवर अवलंबून असल्याने, मात्र जिवघेण्या प्रवासाची वेळ ही या आदिवासी बांधवांवर येऊन ठेपली.
या आदिवासी बांधवांच्या जिवघेण्या प्रवासाची दखलही प्रशासन घेणार का? असा प्रश्न मात्र या आदिवासी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे. उरण तालुक्यात येणारे मात्र माथेरान डोंगरदरीत वसलेले खोंडा या आदिवासी गावातील आदिवासी बांधवांची उपजीविका ही संपूर्णपणे माथेरानवरच अवलंबून आहे.
या खोंडा गावाकडे जाण्यासाठी माथेरानमधील शार्लेट लेक जवळील छत्रपती शिवाजी लेटर या नावाने ओळखला जाणार्या दरीतून शिडी उतरून खाली जाण्याचा व पुढे पायवाट असा एकमेव मार्ग आहे. तर या मार्गावरी आदिवासी बांधवांनी त्यांच्या मेहनतीतून तयार केलेली शिडी ही काही वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये पूर्णपणे नष्ट झाली होती.
त्यावेळेस माथेरानमधील असलेले गुजरात भवन हॉटेलचे मालक उमेश दुबल यांनी एक लाख रुपये आर्थिक सहाय्य दिल्यामुळे ही तुटलेली शिवाजी लेडर शिडी पुन्हा नव्याने उभारण्यात आली होती. मात्र आता झालेल्या मुसळधार पावसात खोंडा गावा कडे जाणारी दरी भागातील पायवाट ही मोठ्या प्रमाणात दरी भागातील झालेल्या भूस्खलनामुळे लुप्त पावली आहे.
आपल्या कुंटूबातील लोकांच्या उदरनिर्वाह करण्याकरिता मात्र या खोंडा आदिवासी गावातील आदिवासी बांधवाना आपला जिव धोक्यात घालून माथेरानमध्ये यावे लागत असल्याने, आमच्या या प्रवासाची प्रशासन दखल घेणार का?असा प्रश्न आहे.
भारताला स्वातंत्र मिळून 75 वर्षे पूर्ण झाली तरी देखिल दर्या खोर्यातील अनेक आदिवासी गावात अजून विज पुरवठा नाही. त्याच प्रमाणे या खोंडा गावात देखिल अजून विज पुरवठा झाला नाही. ते काम कायदेशीर मार्गाने पूर्ण करून देण्यासाठी माझी पूर्ण तयारी आहे.
जनार्दन शंकर पारटे, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते, माथेरान