Nana Patekar Childhood Memories : मुरुडच्या आठवणींत अमर झालेला ‘नटसम्राट’

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मुरुडवर शोककळा; बालपणीच्या आठवणींना नातेवाईक, वर्गमित्रांनी दिला उजाळा
Nana Patekar Childhood Memories
पाटील खानावळीमध्ये मनसोक्त भोजन करत असताना नाना व त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर व खानावळीचे मालक सुरेश पाटील.छायाचित्रे : सुधीर नाझरे
Published on: 
Updated on: 

मुरुड-जंजिरा : सुधीर नाझरे

मुरुड हे माझं आजोळ, असा सार्थ अभिमान बाळगणारे आणि मुरुडच्या भूमीशी अखेरपर्यंत नाळ जोडून ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण मुरुड शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नानांचे बालपण, त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि कलाविश्वातील पहिल्या अभिनयाचा श्रीगणेशा मुरुडच्याच मातीत झाला होता. नानांच्या निधनाने मुरुडमधील त्यांचे बालमित्र, नातेवाईक, स्थानिक पत्रकार आणि नागरिक अत्यंत शोकाकुल झाले असून त्यांनी नानांच्या सहवासातील विविध आठवणींना उजाळा दिला.

मुरुड येथील नाना पाटेकर यांचे घर.
मुरुड येथील नाना पाटेकर यांचे घर.

कुटुंबाचा काळजी करणारा मुख्य आधारस्तंभ हरपला - मामेभाऊ श्रीकांत उर्फ बापू सुर्वे

नाना पाटेकर यांचे मामेभाऊ श्रीकांत सुर्वे यांनी अत्यंत भावुक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. नानांची आई ही श्रीकांत सुर्वे यांच्या वडिलांची मोठी बहीण. बालपणात नानांचे वास्तव्य मुरुडमधील मारुती नाक्यावरील पाथरे यांच्या घरी तसेच दीपक खातू यांच्या घरी होते. नानांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण मुरुडच्या शाळा नंबर ४ मध्ये झाले. मुंबईच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी नानांच्या वडिलांनी त्यांना मुरुडला सुर्वे मामांकडे पाठवले होते. नाना अत्यंत कुटुंबवत्सल होते; नातेवाईकांची आणि भावांची आवर्जून आपुलकीने चौकशी करायचे. कुटुंबाची काळजी करणारा असा माणूस आमच्यातून निघून जाणे ही संपूर्ण सुर्वे कुटुंबासाठी अत्यंत दुःखदायक बाब आहे.

मुरुड येथील शिक्षण घेतले ती प्राथमिक शाळा.
मुरुड येथील शिक्षण घेतले ती प्राथमिक शाळा.

केने गुरुजींनी जबरदस्तीने रंगमंचावर उभे केले आणि 'नट' घडला - बालमित्र हेमंत जाेशी

नानांचे बालमित्र हेमंत जोशी यांनी नानांच्या अभिनयाच्या सुरुवातीचा रंजक किस्सा सांगितला. मुरुडच्या शाळा नंबर ४ मध्ये शिकत असताना केने गुरुजींनी नानांमधील कलागुण ओळखले होते.१९९५ मध्ये नाना माझ्या नवीन घरी आले असताना त्यांनी स्वतः ही कबुली दिली होती. शाळेच्या स्नेहसंमेलनात 'वाल्या कोळी' नाटकाचे सादरीकरण होते. नारदाची भूमिका प्रभाकर घरत याने केली होती, तर वाल्याच्या 'कुंजर आणि गुंजर' या साथीदारांपैकी एका भूमिकेसाठी केने गुरुजींनी नानाला जबरदस्तीने रंगमंचावर उभे केले होते. तिथूनच नानांचा नट होण्याचा प्रवास सुरू झाला. आजचा हा नटसम्राट आपल्यातून गेला ही अतिशय दुःखाची बातमी आहेे.

सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर हे मंगेश कुलकर्णीं यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पद्मदुर्गच्या लोकेशनच्या पाहणीसाठी होडीतून प्रवासाचा आनंद लुटतानाचा क्षण.
सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर हे मंगेश कुलकर्णीं यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पद्मदुर्गच्या लोकेशनच्या पाहणीसाठी होडीतून प्रवासाचा आनंद लुटतानाचा क्षण.

खांद्यावर तीन फुटांचा रावस मासा घेऊन कोळीवाड्यातून चालणारा दिलदार नाना- सुधीर नाझरे

नानांचे मुरुडच्या पत्रकारांशी अत्यंत मैत्रीचे संबंध होते. २००६ मध्ये नाना, त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर, मंगेश कुलकर्णी आणि पत्रकार सुधीर नाझरे शूटिंगचे लोकेशन पाहण्यासाठी पद्मदुर्ग किल्ल्यावर गेले होते. जाताना बाळा साखरकर यांच्या बोटीतून प्रवास करताना नानांचा परखड आणि दिलखुलास स्वभाव सर्वांनी अनुभवला. किल्ल्यावरून परतताना नानांना अचानक मासेमारी करण्याची हुक्की आली. त्यांनी स्वतः जाळे समुद्रात फेकून अवघ्या ३ फुटांचा मोठा मासा पकडला! तो मासा खांद्यावर घेऊन नाना मुरुडच्या बाजारातून आणि कोळीवाड्यातून आनंदात चालत निघाले होते. मुरुडच्या समुद्रावर घर बांधण्याची त्यांची इच्छा होती, पण ती अधुरीच राहिली.

छायाचित्रात बालमित्रांशी गप्पांत रममाण झालेले नाना.
छायाचित्रात बालमित्रांशी गप्पांत रममाण झालेले नाना.

रोह्यात अजित पवारांना उत्तर - जेवणार तर मुरुडला भावाच्याच खानावळीत!- विजय पाटील

नाना जेव्हा जेव्हा मुरुडला येत, तेव्हा पाटील खाणावळीत बसून मुरुडची मच्छी खाण्याचा त्यांचा हट्ट असायचा. रोहा येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे नेते स्व. अजित पवार यांनी नानांना जेवणाबाबत विचारले असता, मला माझ्या मुरुडला जाऊन माझ्या भावाकडे पाटील खाणावळीतच जेवायचे आहे, असे ठाम उत्तर नानांनी दिले होते. आपण मुरुडचे भूमिपुत्र आहोत याचा त्यांना नेहमी अभिमान वाटायचा.

होडीतील साचलेले पाणी उपसण्यापासून ते समुद्रातील मासेमारीपर्यंतचा प्रवास - बाळा साखरकर

कोळी समाजातील बालमित्र बाळा साखरकर यांनी सांगितले की, त्यांचा नातू चंद्रकांत साखरकर नानांचा वर्गमित्र होता. शाळा सुटल्यानंतर नाना समुद्रकिनारी होड्या पाहायला यायचे. होडीत साचलेले पाणी बाहेर काढायला सांगितले की, नाना अत्यंत उत्साहाने काम करायचे. रविवारी आमच्यासोबत समुद्रात मासेमारीला यायचे. पुढे मोठे नट झाल्यानंतरही मुरुडमध्ये आल्यावर 'बाळा साखरकर हे माझे बालमित्र आहेत' अशी आठवण ते आवर्जून सांगत असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news