

मुरुड जंजिरा : मुरूड जंजिरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला म्हणून जाहीर झाल्यानंतर आज पालिकेच्या दहा प्रभागातील 20 जागांची आरक्षण सोडत पार पडली. यात काही विद्यमानांचा पत्ता कट झाला आहे. नवीन इच्छुकांना संधी मिळाली आहे तर काही विद्यमानांना अन्य प्रभागात जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. येथील पालिकेच्या 10 प्रभागातील नगरसेवकांच्या 20 जागांची आरक्षण सोडत ाधिकृत अधिकारी -श्रीकांत गायकवाड व मुख्याधिकारी -सचिन बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत सभागृहात घेण्यात आली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी -नंदकुमार आंबेतकर, अनिकेत जगदाळे,प्रकाश आरेकर, अनिकेत भोसले तसेच शहरातील राजकीय पक्षांचे नेते हसमुख जैन श्रीकांत सुर्वे, अविनाश दांडेकर,संजय गुंजाळ, प्रकाश सरपाटील,रहिम कबले, पांडुरंग आरेकर,किर्ती शहा ,आदेश दांडेकर, मृणाल खोत,प्रिता चौलकर,प्रजांली मकु,कुणाल सतविडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
या आरक्षण सोडत नगरपरिषद शिक्षण मंडळाची शाळेचे तीन विद्यार्थी अर्णव टोकलवाड,विनायक टोकलवाड,अनुषका गोंड यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण सोडत बाबत आक्षेप नोंदविला असुन हा आक्षेप आपण निवडणूक आयोगाला कळवावा असे आवाहन प्राधिकृत अधिकारी -श्रीकांत गायकवाड व मुख्याधिकारी -सचिन बच्छाव यांच्या कडे केले. .हा आक्षेप आम्ही निवडणूक आयोगाला कळु असे सांगण्यात आले.
महिलांचा चेहरा खुलला
आरक्षणात अनेक विद्यमानांचे पत्ते कट झाले. तर काही माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अनेक नवीन महिलांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे महिलांच्या चेहर्यावर हास्य फुलल्याचे दिसून आले. माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. आता त्यांना अन्य प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. यात काही नवीन इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यात नाराजी पसरल्याचे दिसून आले. प्रभाग दहा मध्ये सर्वाधिक उमेदवार असल्याने याठिकाणी उमेदवार देताना राजकीय पक्षांची कसोटी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
आरक्षण सोडत कार्यक्रम 2025
अ.क्र प्रभाग क्र.1 सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण (खुला) , प्रभाग क्रमांक 2 ना.मा.प्र. (खुला) सर्वसाधारण (महिला) , प्रभाग क्रमांक 3 ना.मा.प्र. (महिला) सर्वसाधारण (खुला), प्रभाग क्रमांक 4 ना.मा.प्र. (खुला) सर्वसाधारण (महिला) , प्रभाग क्रमांक 5 ना.मा.प्र. (महिला) सर्वसाधारण (खुला), प्रभाग क्रमांक 6 सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण (खुला) , प्रभाग क्रमांक 7 ना.मा.प्र. (महिला) सर्वसाधारण (खुला) , प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जमाती (महिला) सर्वसाधारण (खुला) , प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जमाती (खुला) सर्वसाधारण (महिला) , प्रभाग क्रमांक 10 अनुसूचित जमाती (महिला) सर्वसाधारण (खुला)
अलिबाग नगरपरिषद प्रभाग आरक्षण जाहीर
अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेच्या 20 जागांपेकी 10 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी नगरपालिकेच्या सभागृहात प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे उपस्थित होते. नगरपालिका शाळेमधील 4 मुलांनी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या.
अलिबाग नगरपरिषदमध्ये 10 प्रभागांमध्ये 20 वार्ड आहेत. त्यांचे आज आरक्षण जाहीर करण्यात आले. वॉर्ड क्र. 5 मध्ये अनुसूचित जातीची संख्या जास्त असल्याने एक जागा महिलेसाठी तर दुसरी जागा सर्वसाधारणसाठी राखीव झाली.
प्रभाग 1 मध्ये 1-अ : ना.म.प्र. सर्वसाधारण, 1-ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 मध्ये 2-अ : अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला, 2-ब : सर्वसाधारण, प्रभाग तीनमध्ये 3-अ : ना. म.प्र. महिला, 3-ब : सर्वसाधारण, प्रभाग 4 मध्ये 4-अ : ना.म.प्र. महिला, 4-ब : सर्वसाधारण, प्रभाग 5 मध्ये 5-अ : अनुसूचित जाती महिला, 5-ब : सर्वसाधारण, प्रभाग 6 मध्ये 6-अ : ना.म.प्र. सर्वसाधारण, 6-ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग 7 मध्ये 7-अ : सर्वसाधारण महिला, 7-ब : सर्वसाधारण, प्रभाग 8 मध्ये 8-अ : ना.म.प्र. महिला, 8-ब : सर्वसाधारण, प्रभाग 9 मध्ये 9-अ :अनुसूचित जमाती महिला, 9-ब : सर्वसाधारण, प्रभाग 10 मध्ये 10-अ : अनुसूचित जमाती सर्वसाधारण, 10-ब : सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. आरक्षण सोडतीच्या वेळी अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
2016 मध्ये झालेल्या अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत 8 प्रभागांतून 17 वॉर्ड होते. नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या ही 20 हजार 743 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1192 इतकी असून अनुसूचित जमातींची लोकसंख्या 2735 इतकी आहे, यामुळे अनु. जातीसाठी 1 जागा महिलेसाठी राखीव झाली तर अनुसूचित जमातीसाठी 3 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष पदाकडे लागले आहे.
शेकाप,शिवसेनेत चुरस
या पूर्वीच्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी यांनी युती होती. त्यावेळी राष्ट्रवादीला नगरपरिषदेत जागा मिळाली नव्हती. शेकापची एकहाती सत्ता आली होती, यावेळी शिवसेना शिंदे गट आपला उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभा करणार असल्याने चुरस बघायला मिळणार आहे.