

पनवेल : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानूसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्याचा संकल्पही प्रशासनाने केल्याचे पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी सुचित केले.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चितळे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, निवडणुकीचा प्रत्येक टप्पा अचूकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांचे चोखपणे नियोजन केले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका यंत्रणेमध्ये समन्वय ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगीतले.
राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार पनवेल महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 6 ऑक्टोबर 2025 रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. शहरात एकूण 20 प्रभाग असून प्रत्येक प्रभागात 3 सदस्य याप्रमाणे एकूण 78 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून त्यापैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
सहा क्षेत्रीय कार्यालय
निवडणूक कामकाजासाठी प्रशासनाने 6 क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून भक्कम यंत्रणा उभी केली आहे. एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 12 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता 6 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे साडे चार हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.
महापालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता पथक प्रमुख आणि उमेदवारांचे हिशोब तपासणी पथक प्रमुख यांचीही स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून, यामध्ये पोलीस आयुक्त व महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी देखील आवश्यक बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रचार फेऱ्या, सभा आणि अवाजवी खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यालय व क्षेत्रीय स्तरावर व्हिडिओग्राफी सर्व्हेलियन्स पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
लोकशाही उत्सवात सहभागी व्हा
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते भरारी पथकांच्या तैनातीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली असून, लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज तयार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांनी दिली.