

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा विभागातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेला मुंबरेश्वर तलाव सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर येत आहे. आता हळूहळू तलाव स्वच्छतेकडून प्रदूषणाकडे वळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
सध्या तलावाच्या पाण्यात काही प्रमाणात कचरा साचलेला दिसत आहे. फुले-हार, निर्माल्य, थेट तलावात मिसळले जात असल्याने पाण्याचा रंग बदलून तो हिरवट झाला आहे. पाण्यावर साचलेला थर आणि वाढलेली शेवाळ यामुळे दुर्गंधी पसरत असून तलावाचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत चालले आहे.
कचरा पाण्यावर साचून राहिल्याने सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत नाही, त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. याचा थेट परिणाम जलचर सजीवांवर होत असून मासे व इतर जीव नष्ट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तलावात वाढलेली शेवाळ आणि हिरवट थर हे प्रदूषणाचे ठळक लक्षण मानले जाते.
मुंब्रा विभागातील मुंबईेश्वर तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. तलावाच्या इंट्री गेट परिसरात प्लास्टिक पिशव्या, अन्नाचे उरलेले पदार्थ, फुलांची निर्माल्ये, कागद, बाटल्या तसेच घरगुती कचरा विखुरलेला आढळून येत आहे. या कचऱ्यामुळे परिसराचे विद्रूपकरण होत असून तलावाकडे जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या साचलेल्या कचऱ्याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. कचऱ्यामुळे डास, माशा आणि उंदीर यांची संख्या वाढत असून त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, ताप, अतिसार तसेच त्वचारोगांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तलावात पूजा-अर्चा किंवा फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना घाणेरड्या वातावरणामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
परिसराची प्रतिमा मलीन
नागरिकांच्या मते, इंट्री गेट परिसरात नियमित कचरा उचल न होणे, कचरापेट्यांचा अभाव आणि नियमांची अंमलबजावणी न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव हा परिसरासाठी पर्यावरणीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्या प्रवेशद्वाराजवळील अस्वच्छता ही गंभीर बाब मानली जात आहे. स्वच्छ व शांत वातावरणाची अपेक्षा असलेल्या या ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने परिसराची प्रतिमा मलीन होत चालली आहे.