

Mumbai-Pune Expressway Accident
खोपोली: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज (दि.२६) दुपारी बोरघाटात एक मोठा अपघात घडला. एका कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या विचित्र अपघातात तब्बल २५ ते ३० वाहने एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळली. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर बोरघाटाच्या उतारावर एका कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पुढच्या वाहनाला जोरदार धडक दिली. उतारावर वेग जास्त असल्याने आणि अचानक घडलेल्या या घटनेमुळे मागून येणाऱ्या वाहनांना थांबायला वेळच मिळाला नाही. यामुळे एकापाठोपाठ एक अशा जवळपास २५ ते ३० गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात अनेक लहान-मोठ्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आणि स्थानिक बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत जखमींना वाहनांमधून बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुढील उपचारांसाठी जखमींना रुग्णालयांमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी परिसरातील ग्रामपंचायतींमधून अतिरिक्त रुग्णवाहिका मागविण्यात आल्या आहेत.
या भीषण अपघातामुळे वाहतुकीची काही वेळ कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस आणि बचाव पथकांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.