

पेण शहर : पेण आणि खोपोली यांना जोडणार्या राज्य मार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत पक्के बांधकाम होत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत आता जनतेनेच रस्त्यावर उतरायचे ठरविले असून स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला याची लेखी अर्ज करून कल्पना देऊन देखील ही बांधकामे हटवली जात नसल्याने आता वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हा अध्यक्ष देवेंद्र कोळी यांनी येत्या मंगळवार, दि. 29 एप्रिल रोजी पेण उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मागील काही वर्षांपूर्वी अरुंद असलेल्या पेण - खोपोली राज्यमार्गाचे रुंदीकरण करण्याचे ठरविले असल्याने या मार्गात अडथळा येणारी अनेक घरे आणि मोठमोठी झाडे तोडण्याची वेळ राष्ट्रीय महामार्ग प्रशासनावर आली होती. मात्र आता त्याच ठिकाणी त्याच जागांवर अनेकांनी अतिक्रमणे करून जागा गिळंकृत केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पेण तालुक्यातील सावरसई ग्राम पंचायत हद्दीत देखील बर्याच जणांनी पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी येथील ग्रामस्थ आणि महिला मंडळाने गेली दीड ते दोन वर्ष राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे तक्रार करत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाने सदर रस्त्याचे काम करणार्या कंपनीला 21 मार्च 2024 रोजी सदर अतिक्रमण झालेले बांधकाम काढण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र आज पत्र देऊन एक वर्ष उलटून गेला तरी या ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत बांधकाम काढले तर नाहीच याउलट या रस्त्यालगत दिवसेंदिवस ही बांधकामे वाढतच चाललेली आहेत. त्यामुळे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात ताळमेळ नसल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याने या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आता वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र कोळी यांनी येत्या 29 एप्रिल रोजी पेण उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गेली एक ते दीड वर्षे आम्ही या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत आहोत, मात्र आमच्या या अर्जांना केराची टोपली दाखवली जात आहे.प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अखेर आम्ही देवेंद्र कोळी यांच्याकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता तरी प्रशासनाला जाग येऊन त्यांनी ही कारवाई करावी.
सपना चिंबोरे, ग्रामपंचायत सदस्या, सावरसई
सदर अतिक्रमण हटविण्याबाबत आम्ही संबंधित ठेकेदाराला यापूर्वी नोटीस दिली होती, त्यांना पुन्हा एकदा स्मरणपत्र देऊन हे अतिक्रमण लवकरात लवकर कसे हटविता येईल याची हालचाल सुरू केली आहे.
रवींद्र कदम, अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग-पेण