

ईलयास ढोकले
नाते: रायगड रोडवरील वरंडोली येथे 'कन्स्ट्रक्शन'च्या एका बेफाम कारने एका निष्पाप शेतकरी कुटुंबाचे होत्याचे नव्हते केले आहे. चालकाचा ताबा सुटल्याने ही कार थेट रस्त्यालगत असलेल्या घरामध्ये घुसली. या भीषण अपघातात घराचे प्रचंड नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड रोडवरून MH 06 BE 9433 क्रमांकाची झायलो कार प्रचंड वेगाने येत होती. वरंडोली गावच्या हद्दीत आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट श्री. सचिन परशुराम दळवी यांच्या घरावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की घराची भिंत, अंगणातील मंडप, दरवाजा आणि घरातील साहित्याचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अपघाताच्यावेळी दळवी कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते. मोठा आवाज ऐकताच त्यांनी प्रसंगावधान राखले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. कार चालकाला किरकोळ दुखापत झाली असली तरी, त्याने मद्यप्राशन केले होते, असा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनेनंतर अक्षय कन्स्ट्रक्शनच्या कारभारावर स्थानिकांनी ताशेरे ओढले आहेत. रायगड रोडवर या कंपनीचे डंपर आणि इतर वाहने अतिशय वेगाने आणि नियम धाब्यावर बसवून चालवली जातात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. "संबंधित ठेकेदाराने नुकसानग्रस्त दळवी कुटुंबाला तात्काळ आणि योग्य भरपाई द्यावी. तसेच या मार्गावर अक्षय कन्स्ट्रक्शनच्या वाहनांमुळे होणारी गुंडगिरी आणि वेगावर पोलिसांनी तातडीने लगाम लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."