

कर्जत ः मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकातील प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक मालिका सुरू असून आता 3, 4 आणि 10 ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नेरळ-कर्जत आणि खोपोली-कर्जत लोकल सेवा उपलब्ध नसेल. ब्लॉक कालावधीत प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची चिन्हे आहेत.
कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे 3, 4 आणि 10 ऑक्टोबर रोजी लोकल आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तर, 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरदरम्यान लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या, लोकलच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
मध्य रेल्वेवरील कर्जत आणि खोपोली स्थानकावर प्रवास करणार्या प्रवाशांसाठी सध्या कर्जत स्थानकावर 15 दिवसांसाठी प्री- नॉन इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे. हा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मागील महिन्यातही घेण्यात आला होता. त्याचा परिणाम कर्जत- खोपोली मार्गावरील प्रवाशांवर झाला होता. परंतु आता 3, 4 ऑक्टोबर रोजी रेल्वे वाहतुकीवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, ज्याचा परिणाम थेट कर्जत- खोपोलीतील प्रवाशांवर होत आहे.
हा ब्लॉक भिवपुरी स्थानक, जांब्रुंग केबिन, ठाकूरवाडी, नागनाथ केबिन ते कर्जत या संपूर्ण विभागात लागू राहणार आहे. या दोन दिवसांत कर्जत- खोपोली दरम्यान अप आणि डाउन लोकल गाड्यांची सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे खोपोलीकडे प्रवास करणार्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.दरम्यान,अनेक प्रवाशांनी याबाबत दखल घेत अन्य वाहनांची सोय उपलब्ध करुन घेतली शआहे.
असा असेल विशेष ब्लॉक
3 ऑक्टोबर सकाळी 11.20 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
4 ऑक्टोबर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.45 वाजेपर्यंत
10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20 पर्यंत वाहतूक ब्लॉक विभाग भिवपुरी स्थानक - जांबुंग केबिन ठाकूरवाडी नागनाथ केबिन ते कर्जत ब्लॉक कालावधीत लोकल सेवा बंद
3 ऑक्टोबर रोजी नेरळ कर्जत आणि कर्जत- खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नाही.
4 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर रोजी कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नाही.