

विक्रम बाबर
NH66 Construction Update
पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी पुन्हा एकदा नवीन डेडलाइन जाहीर करण्यात आली असून, यंदाही कोकणवासीयांचा गणेशोत्सव खड्ड्यातूनच होणार असल्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
पनवेल येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी कोकणातील महामार्ग प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “माणगाव, इंदापूर आणि संगमेश्वर या तीन ठिकाणी महामार्गाचे काम अद्याप अर्धवट असून, या भागातील काम विलंबाने सुरू आहे. तरीसुद्धा या ठिकाणच्या सर्व्हिस रोडची देखभाल सुस्थितीत राहावी, यासाठी मी आदेश दिले असून, त्या कामांची स्वतः पाहणी करणार आहे. या भागाव्यतिरिक्त, चिपळूण येथे कोसळलेल्या पुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.”
परशुराम घाटातील वारंवार होणारे अपघात आणि दरडी कोसळण्याच्या समस्या दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. “या घाटातून महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी आणि ट्रॅफिक जाम टाळावा, यासाठी ‘वायाडक्ट’चा नवा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवला आहे. या वायाडक्टमुळे परशुराम घाटातील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल,” असे भोसले म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबामुळे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणच्या प्रवाशांना खडतर प्रवास करावा लागतो. यंदाही काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात असतानाच, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी डिसेंबरची नवीन डेडलाइन जाहीर केली आहे.