

शिरगांव : आज कर्क संक्रातीच्या दिवशी शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी येथील श्री सिद्धेश्वर पावणाई देवालयासमोर हर हर महादेवची घोषणा देत, ढोल ताशांच्या गजरात, एकमेकांवर खेळीमेळीच्या वातावरणात चिखल फेक करीत ‘भल्ली भल्ली भावय’ उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. या उत्सवापासून श्री पावणाई देवीच्या वार्षिकची सुरुवात होते.
सकाळी भावई देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी गावातून देवीला नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर बारा पाच मानकरी, ग्रामस्थ एकत्र मिळून श्री पावणाई देवी देवालयासमोर ढोल ताशांच्या गजरात ‘भल्ली भल्ली भावय...’ अशी ललकारी देत या भावई खेळास सुरूवात केली. गावातील सर्व लहान थोर मंडळीनी खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांवर चिखल फेक करीत हा उत्सव आनंदाने साजरा केला.
यावेळी होळदेवकडील सुमारे 100 किलोचा दगड प्रत्येक जण दोन्ही हातांनी योग्य पकड देऊन शक्तीप्रदर्शन करून उचलण्याचा प्रयत्न करतात हे बघण्यासारखे असते. त्यानंतर जमिनीत (चिखलात) पुरण्यात आलेला नारळ प्रत्येकजण आपल्या हस्त कौशल्याने काढण्याचा प्रयत्न केला. याला ‘सापड खेळणे’ असे म्हणतात. त्यानंतर चौर्यांशीच्या चाळ्यावर जाऊन नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम झाले. त्यानंतर पुन्हा सर्वानी श्री पावणाई देवालयासमोर एकत्र येत काल्पनिक रित्या शिकारीचा खेळ खेळला.
या उत्सवाच्या दिवशीच्या आदल्या दिवशी गावात देसरुड काढण्यात येते. शेती हंगाम असून देखील शेतकर्यांना विरंगुळा व आनंद देणारा हा भावई उत्सव सर्वजण मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा केला. देवस्थान कमिटीचे चेअरमन योगेश मिराशी तसेच इतर विश्वस्त, पदाधिकारी, बारा पाच मानकरी, ग्रामस्थ, पोलिस पाटील सौ. कामिनी नाईक या उत्सवाला उपस्थित होते.