

विश्वास निकम
कोलाड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील वरसगांव-भिरा फाट्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार संबंधित ठेकेदार असेल अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील कोलाड बाजारपेठेत उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. हा मार्ग 500 मीटर अंतरावर वरसगांव फाट्यावर बंद केला आहे.
या ठिकाणी मातीचा डिगारे टाकून ठेवले आहेत परंतु येथे कोणतेही दिशादर्शक किंवा सूचना फलक नसल्याने अचानक वाहन हे समोरील मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळत आहेत. काल रात्रीच्या सुमारास एक एर्टिगा गाडी ढिगाऱ्यावर चढली परंतु वाहन चालक थोडक्यात बचावला. यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात होतांना दिसत आहेत.
एकतर कोलाडपासून बनविण्यात येत असलेला उड्डाण पुल हा भिरा फाट्याच्या पुढे पाहिजे होत. यामुळे भिरा मार्गाकडे जाणाऱ्या वाहतूकीला कोणताही अडथळा आला नसता व यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले असते. या ठेकेदार व प्रशासन यांच्या चुकीमुळे या महामार्गांवर अपघाताची मालिका सुरु आहे. याला जबाबदार मुंबई-गोवा हायवेचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार हे असल्याचे बोलले जात आहेत.
कारण मुंबई गोवा हायवेवरील अनेक छोट्या गावासाठी उड्डाण पुल बनविण्यात आला आहे. पण मुरुड-भिरा मार्गांवरून पुणे बाजूकडे जाणाऱ्या राज्यमार्गांवरील भिरा फाट्यावर उड्डाण पुल असावा असे महामार्ग अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना जाणीव का झाली नाही. का मुंबई-गोवा मार्गांवरील भिरा फाट्यावर डोळे मिटून सर्व्हे केला काय? असे या मार्गांवरून प्रवास करणारे प्रवाशी नागरिकांकडून बोलले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 17 वर्षांपासून सुरु असून ते एका वर्षात पूर्ण ही होईल. यामुळे या महामार्गांवर वाहनांचा वेग वाढणार आहे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. ते निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे हे गतिरोधक वेगाची नशा अपघाताचे कारण ठरत आहे. या गतिरोधकामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात घडत आहेत.