निश्चितता!

Morning yoga motivation
Morning yoga motivationpudhari photo
Published on
Updated on

ज्योती मुळ्ये

रोज पहाटे उठून योगाच्या क्लासला जायचा मला जाम कंटाळा येतो. ’आजचा दिवस राहू दे’ असं जवळपास रोज वाटतं. रोज रोज काय पहाटे उठायचं, त्यापेक्षा दुलई ओढून मस्त मजेत लोळत पडावं असं वाटतं. पण एकदा का स्वतःला ही मुभा दिली, की दिवसभराचं पूर्ण वेळापत्रक कोलमडून पडतं. जाग आलेलीच असते त्यामुळे पुन्हा झोप तर लागतच नाही, चुकून डोळा लागलाच तर बऱ्याच उशिरा तो उघडतो. मग सुरू होते पळापळ आणि काउंटडाऊन! कारणाशिवाय लोळत पडल्याने आळस घड्याळाच्या काट्यांमागून धावायच्या आपल्या प्रयत्नाला हाणून पाडतो. शिवाय, व्यायाम चुकवल्याचं गिल्ट दिवसभर छळत राहतं ते वेगळंच!

प्रत्येकाच्या दिवसाचा ना, एक ढाचा ठरलेला असतो. आपण त्याला दिनचर्या किंवा नित्यक्रम म्हणतो. याच्यासाठीचा आपल्या तोंडांत बसलेला शब्द आहे, रूटीन! पण रूटीन म्हटलं की, कंटाळा येतो. खरं तर आपल्या सगळ्यांचं आयुष्यात काय करायचं आहे हे ठरलेलं असतं. त्यानुसार प्रत्येकाने आपोआप किंवा ठरवून ध्येयाची, जबाबदाऱ्यांची, दिवसभरातल्या नैमित्तिक कामांची विभागणी केलेली असते वा झालेली असते. रोज उठून टक टक टक अशा पद्धतीने हे सगळं मार्गी लागणं अपेक्षित असतं. आपण ते लावतही असतो. सगळं सुरळीत चाललेलं असतं आणि खरं तर तेच योग्य असतं. आजच्या क्षणोक्षणी बदलणाऱ्या अनिश्चित जगात आपल्याला दिलासा देणारं, आश्वस्त करणारं, आत्मविश्वास शाबूत ठेवणारं, जगण्याच्या प्रतलावर ठामपणे रोवून धरणारं तेच असतं. रोजच्या या निश्चित पण ठाम प्रवासातूनच आपण ध्येयाकडे वाटचाल करत असतो.

Morning yoga motivation
Lohagad Case: लोहगडावर धक्कादायक खून उघड; होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलून संपवल्याचा आरोप

कालांतराने प्रत्येकालाच हा प्रवास सवयीचा होतो. सवयीचा होतो म्हणून त्यातलं औत्सुक्य संपतं. औत्सुक्य संपल्यामुळे तो निरस व्हायला लागतो. त्यात तोचतोचपणा यातला लागतो. मग आपल्यालाच ही सरळ चाललेली निश्चितता बोचायला लागते. आपण प्रयत्नपूर्वक मेहनतीने बसवलेल्या आयुष्याच्या सुरेख घडीची शिवण आपल्या नकळत सैल व्हायला लागते. हळूहळू प्रत्येक गोष्टीचीच कटकट वाटायला लागते. ’आजचा दिवस राहू दे' पासून सुरू झालेली ही भुणभुण हे मीच का करायचं? रोजच का करायचं? किती जास्त पडतं माझ्यावर, इथून सुरू होऊन माझ्यावरच सगळं पडतं, मलाच सगळं करावं लागतं इथपर्यंत येऊन संपते.

आपली नसलेली दुःख, काळज्या, चिंता प्रत्यक्षापेक्षा मोठ्या वाटायला लागतात. या जगात मीच कशी संकटांनी ग्रासलेली आहे, ही भावना प्रबळ व्हायला लागते. लक्षात येत नाही, पण ही सुरुवात असते आपण महत्प्रयासाने बसवलेलं आयुष्य विस्कटण्याची. आपण एकदा का या भावनेला प्रतिसाद दिला की, आपणच मेहनतीने बसवलेल्या दिनक्रमातल्या आनंददायी, प्रेरणादायी, ध्येयपूर्तीकडे नेणाऱ्या चौकटी निखळायला सुरुवात होते. मग सुरू होतो सबबी पुढे करून जिथे तिथे माघार घेण्याचा खेळ, जो यथावकाश छोट्याशा झोपेपासून सुरू होतो आणि मोठमोठ्या जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचून आपलं आपल्या फ्रेममधलं अस्तित्व खिळखिळं करतो. आपलं मानसिक स्वास्थ्य हरपतं, नसलेल्या शारीरिक व्याधींची चिंता डोकं पोखरायला सुरुवात करते. या सगळ्या गोंधळात आपण नसलेल्या अडचणी ओढवून घेतोय हे आपल्या ध्यानातही येत नाही.

क्लासवरून परत येताना मला दररोज सत्तरी पार केलेल्या आजींचा एक ग्रुप दिसतो. मी गाडीवर असते व त्या सहाजणी मॉर्निंग वॉक संपवून घराकडे निघालेल्या असतात. पहायला गेलं तर आमची काहीच ओळख नाही. पण समोरासमोर आलो की, त्या आवर्जून माझ्याकडे पाहुन छान स्माईल देतात. गेल्या अनेक दिवसांत हे इतकं ठरून गेलेलं असतं की, आता ठराविक ठिकाण आलं की माझी नजर त्यांना शोधते. त्या दिसल्या की, मला हायसं वाटतं. माझा दिवस सुरळीत सुरू होतोय याची मला खात्री पटते.

Morning yoga motivation
Bhutan Folktales on nature: एकजुटीचं झाड; निसर्गाशी असं घट्ट नातं जपणाऱ्या भूतान संस्कृतीतून आलेली प्रख्यात लोककथा

वयाची सत्तरी पार केलेल्या या आजींच्या आयुष्यात काय कमी दुःख असतील? त्यांना त्यांची व्यवधानं, त्यांचे त्रास, काळज्या, त्यांचे आजार, त्यांचं एकटेपण, वार्धक्य, त्याने आलेल्या मर्यादा, अनिश्चितता काय कमी असतील? खऱ्या अर्थाने एकला प्रवास सुरू करण्याचं, निःसंग होण्याचं त्यांचं वय... तरीही एकमेकींच्या साथीने, अगदी रस्त्यावरच्या तिऱ्हाईत बाईचीसुद्धा दखल घेत त्या या वयातही ठाम टिकून आहेत आणि वयाच्या या टप्प्यावर त्यांच्यावर खरोखर ओढवलेल्या व झेपवता न येणाऱ्या अनेक संकटांना एकावेळी आव्हान देतायत. वर्षानुवर्षांच्या अनुभवातून समोर आलेलं वास्तव स्वीकारण्याची ही समंजस्यता त्यांच्याकडे आलीय. म्हणूनच त्यांचा दिवस वाहता आहे. त्यांचं आयुष्य प्रवाही आहे. या टप्प्यावरूनही ते अगदी सहजतेनं पुढे खळाळत वाहतंय. खऱ्याखुऱ्या अनिश्चिततेच्या काळात त्या निश्चिंत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news