Wild Vegetables: श्रावणात रानभाज्यांची लज्जतदार मेजवानी! दिवसानुसार रानभाज्यांची परंपरा; आरोग्यवर्धक भाज्यांना बाजारात वाढती मागणी

चव, पौष्टिकता आणि पारंपरिक औषधी उपयोग यामुळे रानभाज्या खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
Wild Vegetables
Wild VegetablesPudhari
Published on
Updated on

रायगड: दर्श अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होताच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सुधागड-पाली परिसरातील डोंगरदऱ्या, माळराने आणि जंगलभाग विविध प्रकारच्या रानभाज्यांनी बहरले आहेत.

पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणार्‍या या रानभाज्यांची सध्या बाजारपेठेत मोठी आवक होत असून, श्रावणातील सात्त्विक आहाराच्या परंपरेमुळे त्यांना विशेष मागणी आहे. चव, पौष्टिकता आणि पारंपरिक औषधी उपयोग यामुळे रानभाज्या खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

Wild Vegetables
Raigad Fishermen: डिझेलच्या वाढत्या दरामुळे पारंपरिक मच्छिमार चिंतेत

श्रावण महिना सुरू होताच अनेक कुटुंबांमध्ये मांसाहार टाळून सात्त्विक व हलका आहार घेण्याची परंपरा आहे. त्यातच श्रावणातील विविध सण, व्रत-वैकल्ये आणि धार्मिक दिवसांनुसार विशिष्ट रानभाजी करण्याची पद्धत आजही ग्रामीण आणि आदिवासी भागात टिकून आहे. त्यामुळे या काळात रानभाज्यांना केवळ खाद्यपदार्थ म्हणून नव्हे, तर स्थानिक संस्कृती आणि परंपरेचा एक भाग म्हणूनही महत्त्व प्राप्त झाले आहे.

Wild Vegetables
Raigad Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी रायगड प्रशासन सज्ज! शांतता कमिटीच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

दिवसागणिक रानभाजीची परंपरा

सुधागड परिसरात श्रावणातील प्रत्येक दिवसाशी काही ना काही रानभाजी जोडलेली आहे. श्रावण सोमवारी कौला किंवा कैला, तर शुक्रवारी जिवतीची फुले यांचा वापर केला जातो. शनिवारी राजगिरा, कुर्डू, कुळी, टाकळा आणि आम्ली यांची पंचभेळी भाजी केली जाते.

ऋषीपंचमीच्या दिवशी देठी, देवभात, भारंगी, शेंडवेल, पाथरी, रानअळू यांसह उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांची मिसळ करण्याची प्रथा आहे. गौरीच्या दिवशी केनी आणि कुर्डू, तर बैलपोळ्याला चवळीच्या पानांचे मुठे केले जातात. वसुबारसेला सुरण, आळूकंद आणि काशी कोहळा यांची भाजी करण्याची परंपरा काही भागांत आजही जपली जाते. या परंपरांमुळे रानभाज्यांचा आहारातील वापर केवळ पावसाळ्यापुरता मर्यादित न राहता पिढ्यान्पिढ्या पुढे जात आहे.

रानभाज्या म्हणजे निसर्गाची देणगी

रानभाज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. पावसाळ्यात जंगल, डोंगरउतार, शेताच्या बांधावर, माळरानात आणि ओलसर जमिनीत या भाज्या नैसर्गिकरीत्या उगवतात. त्यामुळे स्थानिक नागरिक त्यांना निसर्गाची देणगी मानतात.

या भाज्यांमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, तंतू आणि इतर पोषक घटक आढळतात. मात्र, प्रत्येक रानभाजीची ओळख आणि योग्य प्रक्रिया माहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनोळखी वनस्पती खाणे टाळावे, अशी जाणकारांची सूचना आहे.

औषधी गुणधर्मांचा खजिना

स्थानिक पातळीवर अनेक रानभाज्यांचा पारंपरिक औषधी उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, कपाळफोडीचा वापर आमवात, मलावरोध, पाळीच्या तक्रारी आणि जुनाट खोकल्यासाठी केला जात असल्याचे जाणकार सांगतात. कंटोली ही भाजी मधुमेह तसेच डोकेदुखीसाठी उपयुक्त मानली जाते. सध्या बाजारात कंटोलीला चांगला भाव मिळत असून, एका वाटीसाठी सुमारे ५० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे विक्रेते सांगतात. भारंगीची सुकी भाजी तसेच वालासोबत केलेली भाजी विशेष लोकप्रिय आहे.

कुर्डूचा उपयोग कफ, दमा आणि मूतखडा यांसारख्या विकारांमध्ये पारंपरिक पद्धतीने केला जातो. काही रानभाज्यांचा शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांमध्येही वापर केला जातो.

काटेमाठ प्रामुख्याने ओसाड किंवा मोकळ्या जमिनीवर आढळतो. तर आंबट-गोड चवीची चुका भाजी रुचिवर्धक म्हणून ओळखली जाते. याशिवाय अंबाडा, खरशिंग, दिंडा, टाकळा, बांबूचे कोंब, कुड्याच्या शेंगा, पाथरी, रानअळू, शेंडवेल आदी विविध रानभाज्या सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

आदिवासी महिलांना रोजगाराची संधी

रानभाज्यांच्या वाढत्या मागणीचा थेट फायदा स्थानिक आदिवासी महिला आणि ग्रामीण महिला बचतगटांना होत आहे.

“रानभाज्यांचे आहारातील महत्त्व परंपरागत आहे. शासनाने रानभाज्यांना हक्काची बाजारपेठ, हमीभाव आणि प्रोत्साहन देण्याबरोबरच रानभाजी महोत्सवांचे आयोजन करावे. आदिवासी व महिला गटांना सहभागी करून विक्रेत्यांना शास्त्रशुद्ध माहिती दिल्यास रानभाज्यांची विक्री आणि त्यातून मिळणारे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.”

- तुषार केळकर, प्रयोगशील शेतकरी, उद्धर-सुधागड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news