

Monsoon wild Ranbhaji provide employment to tribals
उरण : राजकुमार भगत
यावर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्याने रानभाज्या आणि कंद देखिल लवकर बाजारात विक्रीसाठी आले आहे. सध्या जंगलातील रानभाज्यानी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. पावसामुळे भाजीच्या मळ्यांचे मोठे नुकसान झाल्याने नेहमीच्या भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामानाने या पावसाळ्यातील रानभाज्या या स्वस्त मिळत असल्याने त्यास ग्राहकांची चांगली मागणी आहे. यातून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.
उरण तालुका हा बहुतांश डोंगराळ आणि जंगलाने वेढलेला असल्याने या तालुक्यात अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती, फळे आणि रानभाज्या आढळतात. उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागली की, या भागातील आदिवासी जंगल, डोंगर आणि माळरानात आढळणारे करांदे, हळदे या सारखे कंद गोळा करून त्याची पनवेल, उरण या सारख्या मोठ्या बाजारपेठात विक्री करून आपली उपजिविका करतात. तसेच शेवळा, टाकळा, कंटोळी, कोरळा, कुर्डू यासारख्या रानभाज्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने सध्या या भागातील बाजारपेठा या रानभाज्यांनी गजबजून गेल्या आहेत. या प्रकारच्या रानभाज्या या पावसाळ्यातच मिळत असल्याने खवय्यांना देखिल या रानभाज्यांचे वेध लागलेले असतात.
पावसाळ्यात बहुतांश आदिवासींना रोजगार नसल्याने तालुक्यातील बहुतेक आदिवासी पुरूष आणि स्त्रिया या रानभाज्या गोळा करण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करतात आणि त्यावरच त्यांचा दोन तिन महिने उदरनिर्वाह चालतो.
चिरनेर, वेश्वी, रानसई, कोप्रोली, आवरे, पुनाडे, सारडे तसेच उरण जवळील द्रोणागिरी डोंगरात अशा प्रकारच्या भाज्या आणि कंद मोठ्या प्रमाणात आढळतात. परंतु गेल्या काही वर्षापासून उरण तालुक्यात विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात भरावांची कामे सुरू असल्याने या भागातील जंगले, डोंगर आणि माळराने पोखरून त्यांची माती या भरावांसाठी वापरत असल्याने या भागातील जंगल, डोंगर येथून मिळणार्या रानभाज्या आणि इतर कंदाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे पूर्वी एक दोन तासात गोळा करता येणा-या रानभाज्याना आता पूर्ण दिवस लागत असल्याची खंत या भागातील आदिवासी व्यक्त करत आहेत. त्यामुळे या भागातील आदिवासींच्या आअर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम झाला आहे. तसेच या रानभाज्या कोणतेही खते आणि कीटकनाशकांच्या वापराशिवाय मिळत असल्याने या भाज्या पोष्टीक आणि औषधी असतात त्यामुळे शासनाने या भागातील जंगल आणि आदिवासींचे संवर्धन करण्यासाठी या भागातील जंगल आणि डोंगरातील माती काढण्यास बंदी आणावी, अशी मागणी या भागातील आदिवासी बांधव करीत आहेत.
पहिला पाऊस पडला की डोंगराळ भागात रान माथ्याला ज्या भाज्या तयार होतात, त्याना रानभाज्या असे म्हटले जाते. या भाज्यांची चव अनोखी तसेच त्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे या भाज्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसतो. यामध्ये कुलू, अंबाडी, शेवळ, टाकला, भारंगी, कंटोळी आदीसह अन्य रान भाज्याचा समावेश होत असतो.