Mithai Price Hike: आगामी सणासुदीत मिठाई २० टक्क्यांनी महागणार? साखरेसह गॅस, दुधाच्या दरवाढीचा फटका

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री
Mithai Price Hike
Mithai Price HikePudhari
Published on
Updated on

सुवर्णा दिवेकर

अलिबाग: गॅस, दूध आणि साखरेच्या दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होण्याची शक्यता आहे. चहा, नाश्ता आणि विविध खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याबरोबरच आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दरातही १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता मिठाई व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सणासुदीला मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

मिठाई, चहा तसेच विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी व्यावसायिक गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काही मिठाई विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी १८ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर सुमारे १,२०० ते १,५०० रुपयांमध्ये मिळत होता. आता त्यासाठी सुमारे ३,००० रुपये मोजावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गॅसच्या वाढलेल्या खर्चामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.

Mithai Price Hike
Hospital Slab Collapse: जिल्हा रुग्णालयात स्लॅब कोसळून रुग्ण गंभीर जखमी

गॅसनंतर दुधाच्या दरवाढीचाही परिणाम मिठाई व्यवसायावर होत आहे. म्हशीच्या दुधाचा दर पूर्वी ८० रुपये प्रतिलिटर होता. तो आता ८५ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे ६० रुपये प्रतिलिटर असलेल्या दुधाच्या दरात पाच रुपयांची वाढ होऊन तो ६५ रुपये प्रतिलिटर झाल्याची माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली.

मिठाई तयार करताना दूध, साखर आणि गॅस या तिन्हींचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे या तिन्ही घटकांच्या किमती वाढल्याने मिठाई उत्पादकांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.

Mithai Price Hike
Krishna Janmashtami Shopping: श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या खरेदीसाठी चारकोप मार्केटमध्ये गर्दी

मिठाई व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या साखरेच्या दरवाढीने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. ४५ ते ४८ रुपये किलो दराने मिळणारी साखर आता ७० ते ८० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेच्या दरातील या वाढीचा परिणाम चहा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि मिठाई उत्पादकांवर होणार आहे.

चहाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या १० रुपयांना मिळणारा चहा १२ ते १५ रुपये, तर २० रुपयांचा चहा २५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चहाच्या एका कपासाठीही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

साखरेच्या दरवाढीमागे कमी उत्पादन, मर्यादित साठा आणि सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी ही कारणे असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

हवामानातील बदलामुळे ऊस पिकावर परिणाम होऊन उत्पादनात घट झाल्याचाही परिणाम साखरेच्या बाजारभावावर होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गॅस, दूध आणि साखरेच्या वाढत्या किमतींमुळे मिठाई व्यवसायातील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दरवाढ केल्यास ग्राहकांची खरेदी कमी होण्याची भीतीही व्यावसायिकांना आहे.

गणेशोत्सवापासून सणासुदीचा हंगाम सुरू होत असल्याने मिठाईला मोठी मागणी असते. मात्र, उत्पादन खर्च वाढल्याने पेढे, बर्फी, लाडू, मलाई बर्फी यांसह विविध मिठाईंच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीत मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news