Migratory Bird: कोकणात येणारे स्थलांतरित पक्ष्‍यांचे थवे धोक्यात; पक्षी अभ्यासकांचे मत

पाणी प्रदूषण, अतिक्रमण व अपुऱ्या सुविधांमुळे अधिवासावर ताण
Migratory Birds
Migratory BirdsPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

जयंत धुळप

रायगड: जगातील तब्बल ४९ टक्के स्थलांतरित प्रजातींची संख्या वेगाने घटत असल्याचा अत्यंत चिंताजनक इशारा देण्यात आला आहे. मध्य आशियाई उड्डाण मार्गावर (सेंट्रल एशियन फ्लायवे) असलेल्या भारताची विशेषतः महाराष्ट्राची या संवर्धनात मोठी जबाबदारी आहे.

भरतपूरपासून कोकणापर्यंत स्थलांतरित पक्षांचे थवे येत असतात, मात्र त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ पक्षी अभ्यासक तथा सिस्केप संस्थेचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

Migratory Birds
Mumbai Dog Bite Cases: मुंबई-ठाण्यात ५ वर्षांत ९ लाख जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा; रेबीजमुळे १९ जणांचा मृत्यू

१० ऑक्टोबर या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रेमसागर मेस्त्री पुढे म्हणाले, दरवर्षी मे आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी जगभरात ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ साजरा केला जातो. यंदा हा दिवस १० ऑक्टोबर रोजी होत असून, एव्हरी बर्ड काऊंटस-युवर ऑब्झरवेशन मॅटर्स अर्थात "प्रत्येक पक्षी महत्त्वाचा आहे - तुमचे निरीक्षण महत्त्वाचे आहे!" ही यंदाची जागतिक संकल्पना आहे.

कोणताही पासपोर्ट किंवा व्हिसा न घेता हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीमा ओलांडणाऱ्या या पाहुण्या पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'सीएमएस' कॉन्व्हेनशन ऑन मायग्रेटरी स्पेसीजसारखे करार कार्यरत आहेत. मात्र, मार्च २०२६ मध्ये ब्राझीलमधील पँटानाल येथे पार पडलेल्या सीएमएसच्या १५ व्या परिषदेत, जगातील तब्बल ४९ टक्के स्थलांतरित प्रजातींची संख्या वेगाने घटत असल्याचा अत्यंत चिंताजनक

इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मध्य आशियाई उड्डाण मार्गावर असलेल्या भारताची आणि विशेषतः महाराष्ट्राची या संवर्धनात मोठी जबाबदारी असल्याचे मेस्त्री यांनी पुढे सांगितले.

Migratory Birds
Banganga Lake Mumbai: ऐतिहासिक 'बाणगंगा'ला आता लोखंडी जाळ्यांची तटबंदी; नागरिक, राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतर महापालिकेला जाग

ज्येष्ठ पक्षी अभ्यासक मेस्त्री यांनी आपल्या गेल्या तीस वर्षातील पक्षी अभ्यासातून भारतातील आणि विशेषतः कोकण व महाराष्ट्रातील स्थलांतरित पक्ष्यांच्या सध्याच्या बिकट स्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले 'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हणून ओळखले जाणारे गोदावरी व कडवा नदीवरील नांदूर मधमेश्वर (नाशिक) हे पहिले रामसर स्थळ आहे. येथे २३० हून अधिक प्रजाती येतात. मात्र, रामसर दर्जा मिळूनही पाणी प्रदूषण, अतिक्रमण आणि अपुऱ्या सुविधांमुळे येथील अधिवासावर ताण येत आहे.

दरवर्षी लाखांहून अधिक फ्लेमिंगो येणाऱ्या ठाणे खाडी व पाणथळ या भागात सिडकोने भरतीचे पाणी रोखल्यामुळे डीपीएस लेकसारख्या ठिकाणी पाण्याच्या गुणवत्तेवर आणि क्षारतेवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, येथे पक्ष्यांचे येणे धोक्यात आले असून ही 'वेटलँड इमर्जन्सी' मानली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठच्या पाणथळांवर रासायनिक सांडपाणी, पांढरा फेस आणि सिमेंटच्या तटबंधांमुळे पक्ष्यांच्या प्रजाती ४५ वरून थेट २३ वर आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात दिघी पोर्ट, श्रीवर्धन आणि म्हसळा खाडी परिसरातील कांदळवनांची कत्तल, तेल प्रदूषण व प्लास्टिक मुळे सायबेरिया व युरोपातून येणाऱ्या पक्ष्यांचे नैसर्गिक 'रन्वे' (चिखलाचे पट्टे) नष्ट होत आहेत. महाडमधील विरेश्वर व चवदार तलावाच्या काँक्रिट सौंदर्यीकरणाने तळातील नैसर्गिक जैवविविधता नष्ट होत असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news