

म्हसळा : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य गुटखा व पानमसाल्याच्या बेकायदेशीर साठ्यावर म्हसळा पोलिसांनी धडक कारवाई करत कुंभारआळी परिसरातील एका घरावर छापा टाकून २६ हजार १३६ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोला उर्फ रामअवतार रामाधार धिमर (वय ४६ वर्ष) याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई घनश्याम संजय पगार यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर २० जुलै रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कुंभारआळी येथील एकशर शाईन कॉम्प्लेक्समधील भोला धिमर यांच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी २१ हजार ७८० रुपये किमतीचा केसरयुक्त पानमसाला तसेच ४ हजार ३५६ रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण २६ हजार १३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीत हा प्रतिबंधित माल माणगाव येथील शिवा काटकर याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली असून या पुरवठा साखळीचा तपासही पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोटकुळे पुढील तपास करीत आहेत.