

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील मांदाटणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाष्टी कुणबीवाडी आणि पाष्टी बौद्धवाडी या दोन वाड्यांना पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक विहीर जीर्ण होऊन धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. विहिरीचा आतील खालचा भाग हळूहळू ढासळून पाण्यात पडत असल्याने विहिरीतील पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थांना नाइलाजाने हेच गढूळ पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पाष्टी कुणबीवाडी आणि बौद्धवाडी या दोन्ही वाड्यांसाठी एकमेव विहीर सार्वजनिक पाण्याचा स्रोत आहे.यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विहिरीची डागडुजी करून ती वापरात ठेवण्यात आली होती. आता विहिरीची अवस्था अधिकच बिकट झाली असून आतील बांधकामाचा खालचा भाग कोसळत असल्याने पाण्यात माती व बांधकामाचे अवशेष मिसळत आहेत. परिणामी पाणी गढूळ झाले असून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे दोन्ही वाड्यांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना आरोग्याचा धोका पत्करून याच पाण्याचा वापर करावा लागत आहे.त्यातच यंदा परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.
सध्याची विहीर पूर्णपणे कोसळल्यास दोन्ही वाड्यांची पाणीपुरवठा योजनाच बंद पडण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीची पंचायत समितीचे सभापती बबन मनवे यांनी पाहणी केली.
विहिरीचा आणखी भाग कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोन्ही वाड्यांसाठी तातडीने टँकरद्वारे किंवा अन्य पर्यायाने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच नवीन सार्वजनिक विहिरीच्या बांधकामाला लवकरात लवकर मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे अशी आग्रही मागणी पाष्टी येथील दोन वाड्याचे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.