Weather Impact on Health : बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांचा वाढतोय विळखा

वसई-विरारमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली, सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ
Fever
FeverFile Photo
Published on: 
Updated on: 

विरार : वसई-विरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल जाणवत असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी थंडी आणि गारवा जाणवत असताना सकाळनंतर उन्हाचा कडाका वाढत असून, दुपारच्या सुमारास उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रात्री आठ वाजल्यानंतर वातावरणात थंडावा जाणवण्यास सुरुवात होते, तर पहाटे नऊ वाजेपर्यंत थंडीचे वातावरण कायम असते. मात्र, त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना दिवसभर बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. थंडी आणि उष्णतेच्या या सततच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

Fever
Job Fraud Mumbai : नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या काका-पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल

बदलत्या हवामानामुळे वसई-विरार परिसरात सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी तसेच अर्धशिशीसारख्या त्रासाने अनेक नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासूनच आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना या वातावरणाचा अधिक त्रास जाणवत आहे.

अचानक ताप येणे, घशात खवखव होणे, सतत शिंका येणे, अंगात कणकण जाणवणे अशा तक्रारी घेऊन नागरिक उपचारासाठी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे परिसरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दिवसभरातील तापमानातील चढ-उतार आणि रात्रीच्या थंड वातावरणानंतर सकाळी वाढणारी उष्णता यामुळे शरीराला बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण जात आहे. विशेषतः सकाळी घराबाहेर पडताना थंडी जाणवत असल्याने नागरिक उबदार कपड्यांचा वापर करतात; मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका वाढल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो.

कामानिमित्त घराबाहेर पडणारे नोकरदार, विद्यार्थी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना या बदलाचा अधिक सामना करावा लागत आहे. वातावरणातील या अनिश्चिततेमुळे सर्दी-खोकल्यासह तापाच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेपुढेही रुग्णसेवेचे आव्हान निर्माण होत आहे.

अनेक नागरिक सुरुवातीला किरकोळ त्रास समजून आजाराकडे दुर्लक्ष करतात; मात्र लक्षणे वाढल्यानंतर डॉक्टरांकडे धाव घेतात. काही नागरिक स्वतःच्या मनाने औषधे घेत असल्याचेही दिसून येते. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास साध्या वाटणाऱ्या तक्रारींचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे कोणतीही लक्षणे जाणवल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

Fever
FDA Raid : नवी मुंबई, पालघरमध्ये एफडीएचे छापे

वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे

बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य उबदार कपड्यांचा वापर करावा, पुरेसे आणि स्वच्छ पाणी प्यावे, वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे तसेच थंड पदार्थांचे सेवन टाळावे, असा सल्ला दिला जात आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अचानक थंड किंवा उष्ण वातावरणाचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेणेही आवश्यक आहे.

दुहेरी वातावरण ठरतेय त्रासदायक

एकीकडे दिवसा उन्हाचा कडाका आणि दुसरीकडे रात्री जाणवणारा थंडावा अशा दुहेरी वातावरणामुळे वसई-विरारमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलत्या ऋतुमानाचा परिणाम शरीरावर होऊ नये यासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनशैलीत आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. किरकोळ आजार समजून दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेणे, स्वच्छतेचे पालन करणे आणि आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळणे हीच सध्याच्या परिस्थितीत नागरिकांसाठी महत्त्वाची खबरदारी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.