Matheran Water Crisis : पर्यटन केंद्र माथेरानमध्ये आतापासूनच टंचाईच्या झळा

पाणीकपातीमुळे पर्यटन व्यवसायासमोर नवे प्रश्नचिन्ह; वाढत्‍या पर्यटनाला ब्रेक
Matheran Water Crisis
Matheran Water Crisispudhari photo
Published on: 
Updated on: 

नेरळ : आनंद सकपाळ

माथेरानमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी एप्रिल आणि मे महिन्यांत संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आतापासूनच पाणीपुरवठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ नोव्हेंबरपासून आठवड्यातील तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांसह हॉटेल, लॉजिंग आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, माथेरानच्या पर्यटन व्यवसायावरही त्याचे परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता, कर्जत यांच्या आदेशानुसार या पाणी कपातीची माहिती देणारा जाहीर फलक माथेरानमधील मध्यवर्ती श्रीराम चौक येथे लावण्यात आला आहे. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन आणि पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हिवाळ्याच्या सुरुवातीलाच आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ आल्याने माथेरानमधील पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Matheran Water Crisis
Blue Flag Award Maharashtra : ब्ल्यू फ्‍लॅग पुरस्‍कारामुळे विकासाला मिळणार नवा निधी

माथेरानची संपूर्ण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. वर्षभर येथे पर्यटकांची वर्दळ असते. हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, घोडेव्यवसाय आणि अन्य पर्यटनपूरक व्यवसायांमधून शेकडो स्थानिक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. अशा परिस्थितीत आठवड्यातील तीन दिवस नळाला पाणीच उपलब्ध होणार नसेल, तर हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्यापासून ते पर्यटकांना आवश्यक सुविधा पुरविण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

पर्यटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना व्यावसायिकांची दमछाक होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम पर्यटनाच्या प्रतिमेवरही होऊ शकतो. माथेरान हे केवळ पर्यटनस्थळ नसून हजारो नागरिकांचे कायमस्वरूपी वास्तव्य असलेले शहर आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना पर्यटक आणि व्यावसायिकांबरोबरच स्थानिक रहिवाशांच्या दैनंदिन गरजांचाही विचार होणे गरजेचे आहे. आठवड्यातील तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास घरगुती वापर, स्वच्छता आणि अन्य दैनंदिन कामांवरही त्याचा परिणाम होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे माथेरानच्या पर्यटन व्यवसायासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. पर्यटकांना दर्जेदार निवासव्यवस्था आणि मूलभूत सुविधा देणे ही पर्यटनस्थळाची प्राथमिक गरज असते. मात्र, पाणीपुरवठाच अनियमित राहिल्यास पर्यटकांच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो. परिणामी माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या आणि स्थानिक व्यावसायिकांच्या उत्पन्नावरही अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Matheran Water Crisis
Blue Flag Award Maharashtra : ब्ल्यू फ्‍लॅग पुरस्‍कारामुळे विकासाला मिळणार नवा निधी

पाणीटंचाईचे संकट येण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, त्यासाठी नागरिकांना आठवड्यातील तीन दिवस पाण्यापासून वंचित ठेवण्याऐवजी दीर्घकालीन आणि व्यवहार्य उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. एकीकडे माथेरानचा पर्यटन विकास आणि दुसरीकडे पाण्याची टंचाई, अशा दुहेरी आव्हानांचा सामना शहराला करावा लागत आहे. त्यामुळे संभाव्य उन्हाळी टंचाईचे कारण पुढे करून पाणी कपात करण्यापुरते नियोजन मर्यादित न ठेवता माथेरानला कायमस्वरूपी आणि पुरेसा पाणीपुरवठा कसा करता येईल, यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

आतापासूनच नागरिकांना वेठीस का?

एप्रिल आणि मे महिन्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पूर्वनियोजन करणे निश्चितच आवश्यक आहे. मात्र, संभाव्य संकटावर उपाय म्हणून थेट आठवड्यातील तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे का, असा सवाल माथेरानकरांकडून उपस्थित केला जात आहे. पाण्याची बचत, गळती रोखणे, उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पर्यायी स्रोतांचा विचार करण्याऐवजी नागरिकांवर पाणी कपातीचा भार टाकला जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.