

रोहे : उंच डोंगरावर वसलेल्या,निसर्गाचे वरदान लाभलेल्या माथेरानची खरी ओळख आहे ती येथील डोंगरदऱ्यातून धावणारी मिनीट्रेन, या माथेरान रेल्वे स्थानकाला 118 वर्षे पूर्णझाली.
ब्रिटिशांनीशोध लावलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वे पोहोचविण्याचे रेल्वेचे निर्माते आदमजी पीरभॉय होते. त्यांनी या रेल्वेच्या बांधकामासाठी निधी पुरवला होता तर त्यांचे पुत्र अब्दुल पीरभॉय यांच्या नेतृत्वाखाली हे बांधकाम पूर्ण झाले. ही नॅरोगेज हेरिटेज रेल्वे (टॉय ट्रेन) नेरळ ते माथेरानला जोडते आणि 1907 मध्ये सुरू झाली.त्याचवेळी माथेरानमध्ये स्थानकाची निर्मितीही झाली. 13 डिसेंबर 1907 रोजी सुरू झालेल्या या स्थानकाचा 118 वा वर्धापनदिन शुक्रवारी मध्य रेल्वेच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आल.यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांसह प्रवाशांनीही सहभाग घेत आनंद लुटला.
महोत्सवाच्या माध्यमातून 118 वर्षांचा गौरवशाली वारसा पूर्ण करणाऱ्या माथेरान लाईट रेल्वेचा समृद्ध इतिहास सादर करण्यात आला.या निमित्ताने माथेरान स्थानक परिसरात भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात वैभवशाली वारशाशी संबंधित माहिती व वस्तूंचा समावेश होता. भौतिक तसेच आभासी (डिजिटल) माध्यमांद्वारे सादर करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे पाहुण्यांना माथेरान लाईट रेल्वेच्या इतिहास आणि परंपरेची सखोल माहिती मिळाली. या प्रदर्शनामध्ये पुढील बाबींचा समावेश स्टीम लोको 794, 4-चाकी बोगी फ्लॅट रेल वॅगन, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे नॅरो गेज रेल्वेसाठी विशेष वापरली जाणारी) बोगी तसेच माथेरान लाइट रेल्व बोगी यांसह मूळ वारसासंबंधित व सध्या अस्तित्वात असलेल्या रोलिंग स्टॉक वस्तूंचे प्रदर्शन. बार्शी लाईट इंजिनचे कार्यरत मॉडेल. याशिवाय जुन्या काळातील स्थानक कर्मचाऱ्यांचे बॅज, पॉइंट्समन वापरत असलेले पट्टे, स्थानकातील हातघंटी, रोख ठेवण्यासाठीची लाकडी पेटी, मोजमाप काटे व वजन, सिग्नलिंग दिवा, तेलाचे कॅन, पाणी देण्यासाठी वापरले जाणारे ग्लास, काचेचे निगेटिव्ह इत्यादी वारसा वस्तूंचेही प्रदर्शन करण्यात आले.
प्रदर्शनास भेट देणाऱ्या अभ्यागतांना व्हीआर ऑक्युलस चष्म्यांच्या माध्यमातून नेरळ माथेरान मार्गाचा 360 अंशातून व्हर्च्युअल सफारी घडविण्यात आली. नेरळ माथेरानशी संबंधित डायऱ्या, कॉफी मग्स, टी-शर्ट्स आणि की-चेन यांसारखी स्मृतिचिन्हे (मेमोरॅबिलिया) विक्रीसाठीही उपलब्ध करून देण्यात आली. दिवसभर खुली असलेली हे प्रदर्शन आठवणींना उजाळा देणारा होता आणि त्याला प्रवासी, सुट्टीत आलेले पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांसह 200 हून अधिक अभ्यागतांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला सध्या मध्य रेल्वेकडून नेरळ माथेरान नेरळ दरम्यान दररोज 4 गाड्या चालवण्यात येतात. तसेच अमन लॉज माथेरान अमन लॉज दरम्यान एकूण 16 सेवा चालवल्या जातात.