

माथेरान (रायगड) : जेमतेम पाच हजारांच्या आसपास लोकसंख्या असणार्या छोट्याशा माथेरान पर्यटनस्थळावरील नागरिकांना आपल्या न्यायहक्कांसाठी, विविध मागण्यांसाठी, आवश्यक सोयीसुविधा बाबतीत सातत्याने प्रशासनाला साद घालून जागरुक करावे लागते आहे ही बाब खरोखरच हास्यास्पद असल्याचे आता सर्वच स्तरातून बोलले जात आहे
रस्त्यांची झालेली वाताहत असो, विविध प्रभागात वीज, पाण्याची समस्या असो किंवा वाहतुकीचा नेहमीचाच गहन प्रश्न असो ह्या सर्व गोष्टी संबंधित प्रशासन आणि त्यांचे कर्मचारी वर्ग दररोज उघडया डोळ्यांनी पहात आहेत परंतु त्यांना जनतेची कामे मार्गी लावण्याची मुळात मानसिकता नसल्याने नागरिकांना सोशल मीडियाचा आधार घेऊन आपली कैफियत,गार्हाणे मांडण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक कामात झोकून देऊन काम करणारे सक्षम अधिकारी माथेरान शहराला लाभत नाहीत तोवर स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दस्तुरी पासून गावात येण्यासाठी ज्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या मार्गावर खड्डे पडलेले आहेत यातून मार्गक्रमण करताना ई रिक्षा चालकांना कशाप्रकारे तोंड द्यावे लागते. याच खड्डेमय मार्गावर दररोज चार ते पाच ई रिक्षांची डागडुजी करण्यासाठी पनवेलला न्यावे लागते आहे. गणेशोत्सव आलेला असताना अद्यापही काही ठिकाणी विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर काही भागात मातीचे रस्ते पावसामुळे अक्षरशः नाल्यात रूपांतर झालेले आहेत ते सुद्धा पूर्ववत केलेले नाहीत.त्यामुळे प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गणेश दर्शनासाठी जाणार्या भाविकांची यावेळी त्रेधातिरपीट उडणार असून खड्डेमय रस्त्यावरून विजेच्या अभावी अंधारामुळे चालताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून जनतेची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्या त्या विभागातील दक्ष नागरिक बोलत आहेत.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मध्यंतरीच्या काळात येथील समस्या सोडविण्याकरिता अधिकारी वर्गसोबत माथेरान च्या विविध समस्या सोडविण्यासाठी बैठकी घेण्यात आल्या होत्या. परंतु संबंधित अधिकारी वर्गाकडून अद्याप अंमलबजावणी अथवा ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत . एकंदरीत अशी परिस्थिती असताना आमदार यांनी पुन्हा अशा स्वरूपाच्या बैठकीचे आयोजन केल्यास येथील पर्यटन व्यवसायात भर पडण्यास सोयीचे होईल.
चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष, माथेरान