Matheran | सलग सुट्यांमुळे माथेरान पर्यटकांनी बहरले
माथेरान : मिलिंद कदम
सलग चार ते पाच दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरान हे पर्यटकांनी गजबजले असून मिनी ट्रेन, हात रिक्षा, घोडेस्वारी व ई रिक्षाने प्रवास करताना पर्यटक आनंद घेताना ठिकठिकाणी दिसत होते. तर पावसाची मजा घेण्याकरता आलेल्या अनेक पर्यटकांना मात्र निराश व्हावे लागले मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे माथेरानमध्ये सलग सुट्ट्यांमध्ये पावसामध्ये भिजण्याचा आनंद घ्यानाकरता आलेल्या पर्यटकांना येथील घाट रस्त्यामध्ये असलेले धबधबे व शार्लेटलेक येथील धबधबा याचा आसरा घ्यावा लागला त्यामुळे अशा ठिकाणी प्रचंड गर्दी दिसून येत होती.
यावर्षी प्रथमच माथेरानमध्ये जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यापासून सलग पर्यटक घेण्याचे प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, काही वर्षांपूर्वी शाळेंना सुट्टी पडल्यानंतर एप्रिल मे हा येथील मुख्य पर्यटन हंगाम म्हणून गणला जात असे परंतु मागील काही वर्षांमध्ये पावसाळी पर्यटन भरू लागल्यानंतर माथेरानमध्येही त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे व यावर्षी माथेरानमध्ये पावसाळ्यात रेकॉर्ड पर्यटकांनी हजेरी लावली असून येथील व्यवसायिकांना हा हंगाम म्हणजे नवसंजीवनी देणारा ठरला आहे मधल्या दिवसांमध्ये माथेरानमध्ये भरपूर प्रमाणात पर्यटक दिसून येत आहे अनेकांच्या म्हणण्यानुसार इ रिक्षा च्या प्रभावामुळे येथे दिवसेंदिवस पर्यटक वाढत आहेत हा वाहतुकीचा पर्याय पर्यटनाला नवसंजीवनी देणारा ठरला आहे.
मिनीट्रेनला तोबा गर्दी
माथेरानचे प्रमुख आकर्षण असलेली मिनी ट्रेन ही भरभरून वाहतूक करीत आहे व यामध्ये बसून प्रवास करण्यासाठी पर्यटकांच्या लांबच्या लांब रांगा पहावयास मिळत आहे व ज्यांना यामधून प्रवास करता आला नाही ते मिनी ट्रेन बरोबर फोटो काढण्यामध्ये धन्यता मांडताना प्रचंड गर्दी दिसत आहे.
वीस ई रिक्षाही अपुर्या
माथेरान मध्ये सध्या 20 ई रिक्षा सुरू आहे परंतु त्याही अपुर्या पडत असल्याने पर्यटक घोडे व हात रिक्षांना प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे ई रिक्षाच्या प्रभावाने या व्यवसायिकांवर गदा येईल ही शक्यता फार कमी होत असून सर्वांनाच व्यवसाय मिळत असल्याचे आज दिसून आले.अजूनही संख्या वाढणे गरजेचे आहे.

