

पनवेल: युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या क्रूड ऑइल (कच्चे तेल) तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. तुर्की देशाचा ध्वज असलेले ‘टी. सदबर्ग’ हे महाकाय मालवाहू जहाज शुक्रवारी सकाळी मुंबईजवळच्या बुचर बेटावर (जवाहर द्वीप) यशस्वीरित्या दाखल झाले आहे. या जहाजाच्या आगमनामुळे तेलपुरवठ्यावरील ताण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः आशियाई भूभागातील युद्धाच्या सावट्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवर आणि पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. अशा गंभीर तेल संकटाच्या काळात ‘टी. सदबर्ग’ हे जहाज तब्बल 1,57,453 टन क्रूड ऑइल घेऊन मुंबईच्या बंदरात पोहोचले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात आणि इंधन पुरवठा यंत्रणेत आनंदाचे वातावरण आहे.
जहाजाची वैशिष्ट्ये
बुचर बेटावर नांगरलेले हे जहाज सध्या मुंबई बंदर परिसरात आणि समुद्रकिनाऱ्यावर सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरले आहे. या महाकाय जहाजाची तांत्रिक वैशिष्ट्ये महत्वपूर्ण आहेत. जहाजाची क्रुड ऑइल वहन क्षमता 157453 टन आहे.जहाजाची लांबी 277.47 मीटर तर डेफ्थ (खोली)15.8 मीटर आहे.
औद्योगिक क्षेत्राचे लक्ष
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युद्ध आणि राजकीय अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाचे दर आणि उपलब्धता याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतरही तेल संकट कायम असल्याने भारतीय औद्योगिक क्षेत्राचे या संपूर्ण घडामोडीकडे बारकाईने लक्ष लागले होते.
अशा परिस्थितीत या जहाजाद्वारे झालेली मोठी तेल आयात भारतीय बाजारपेठेला आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांना मोठा दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.