Konkan agriculture advisory: हवामान बदलामुळे 'फळांचा राजा' संकटात! आंबा काजू पालवीवर कीड-रोगांचा धोका

शेतकऱ्यांनी वेळीच उपयोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Konkan agriculture advisory
Konkan agriculture advisoryPudhari
Published on: 
Updated on: 

कमलाकर होवाळ

माणगाव: कोकणातील बागायतदारांच्या आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख आधार असलेल्या आंबा आणि काजू पिकांच्या दृष्टीने सध्या पालवी फुटण्याचा आणि वाढीचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. याच टप्प्यावर बदलत्या हवामानामुळे कोवळ्या पालवीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागायतदारांनी वेळीच दक्षता घेणे आवश्यक आहे.

आंबा-काजू बागांचे संरक्षण करून आगामी हंगामातील मोहर प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण कृषी सल्ला जारी केला आहे. या सल्ल्यानुसार बागांचे योग्य व्यवस्थापन करून कीड-रोग नियंत्रणाच्या उपाय योजना कराव्यात, असे आवाहन माणगावच तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

Konkan agriculture advisory
Poladpur News: उद्योगांसह बांधकाम व्यावसायातील पाणी वापरावर निर्बंध आणा; पोलादपुरातील सामाजिक संघटनांची मागणी

आंबा आणि काजू पिकांच्या उत्पादनावर पालवीची निरोगी वाढ, हवामानातील बदल आणि कीड-रोगांचे नियंत्रण यांचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे सध्याच्या संवेदनशील काळात बागांकडे दुर्लक्ष करणे बागायतदारांना महागात पडू शकते.

योग्य वेळी निरीक्षण, शिफारशीनुसार औषधांचा वापर आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यावर भर देण्याची गरज आहे. आंबा बागांमध्ये अनेक ठिकाणी नवीन पालवी फुटली असून, या कोवळ्या पालवीवर तुडतुड्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते. ही कीड पालवीतील रस शोषून घेते.

त्यामुळे पालवीवर चिकट पदार्थ साचून त्यावर काळ्या बुरशीची वाढ होण्याचा धोका निर्माण होतो. यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या उपाययोजना नुसार प्रति १० लिटर पाण्यात डेल्टामेथ्रीन ९ मिलिलिटर मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास थायोफिनेट मिथाईल १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. औषधाची फवारणी करताना ते कोवळ्या पालवीवर व्यवस्थित पसरून टिकून राहण्यासाठी योग्य प्रमाणात स्टीकर किंवा स्प्रेडरचा वापर करण्याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Konkan agriculture advisory
FDA Expired Food Disposal Rules: मुदतबाह्य अन्नसाठ्याच्या विल्हेवाटीसाठी FDA चे कठोर नियम; CCTV आणि GPS चित्रीकरण बंधनकारक

नवीन फुटीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास टोलफेन पायराईड २० मिलिलिटर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पालवीची निरोगी वाढ होऊन ती लवकर परिपक्व होण्यासाठी ०:०:५० किंवा १३:०:४५ यापैकी योग्य पाण्यात विरघळणाऱ्या खताची स्वतंत्रपणे ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ढगाळ हवामानात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बागांचे नियमित निरीक्षण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. काजू पिका मध्ये वेंगुर्ला-१, वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-७, वेंगुर्ला-९ आणि वेंगुर्ला-१० या वाणांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे.

वेंगुर्ला-१ आणि वेंगुर्ला-१० या वाणांच्या काही झाडांवर मोहर दिसू लागला असून, आगामी १५ दिवसांत नव्या पालवीतून मोहर येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत बागायतदारांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

ढगाळ वातावरणात काजू पिकावर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मिलिलिटर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. झाडांच्या बुंध्याभोवती जैविक आच्छादन अर्थात मल्चिंग केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घेणे

कोकणातील आंबा आणि काजू ही केवळ फळपिके नसून, हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहेत. त्यामुळे पालवीच्या अवस्थे पासूनच योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील मोहर आणि उत्पादना साठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेताना औषधांचे प्रमाण, वापराची वेळ, लेबल वरील सूचना आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत. विशेषतः फुलोऱ्याच्या काळात परागीभवन करणाऱ्या मधमाश्यांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी. कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसताच कृषी अधिकारी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच फवारणी करावी, असे आवाहन माणगाव तालुका कृषी विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.