

कमलाकर होवाळ
माणगाव: माणगाव शहर आणि परिसरात रविवारी पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडीचा सामना प्रवासी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना करावा लागला. माणगाव व इंदापूर येथील बायपासचे काम अद्याप अपूर्ण असल्याने निर्माण झालेल्या वाहतूक समस्येने हजारो वाहन धारक अक्षरशः तासन्तास रस्त्यावर अडकून पडले होते. कडक उन्हात वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे मोठे हाल झाले असून शासन आणि संबंधित ठेकेदारांच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शनिवारी सकाळ पासूनच मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढू लागली. माणगाव शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतुकीचा ताण इतका वाढला की मुंबई आणि महाड या दोन्ही दिशांना तब्बल सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
याशिवाय ताम्हिणी घाटमार्गे पुण्याकडून कोकणात जाणाऱ्या वाहनांचीही संख्या लक्षणीय असल्याने माणगाव-निजामपूर मार्गावर सुमारे चार किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक वाहनांमध्ये वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले आणि पर्यटक होते. उन्हाच्या तीव्र झळांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला.
काही वाहनांमधील प्रवाशांकडे पुरेसे पाणीही उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय झाली. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणात निघालेल्या पर्यटकांचा प्रवास मात्र या कोंडीमुळे त्रासदायक ठरला. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखा, माणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी दिवसभर प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
विविध चौकांमध्ये वाहतुकीचे नियमन करून कोंडी फोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असली तरी हा केवळ तात्पुरता दिलासा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या संपूर्ण समस्येच्या मुळाशी माणगाव आणि इंदापूर येथील रखडलेले बायपास प्रकल्प असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन बराच कालावधी लोटला असला तरी बायपासचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. गतीबाबत ठेकेदारांकडून समाधानकारक प्रगती होत नसल्याचा आरोप होत आहे.
बायपासचे काम वेळेत पूर्ण करा
बायपासचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून माणगाव शहराला वाहतूक कोंडीच्या विळख्यातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी होत आहे. वाहतूक कोंडीची पुनरावृत्ती, रखडलेली विकासकामे आणि प्रवाशांच्या होणाऱ्या हालांमुळे आता संबंधित प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यांनी जबाबदारी स्वीकारून ठोस कृती करणे आवश्यक असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. माणगाव बायपासचा प्रश्न केवळ विकासाचा नसून हजारो प्रवाशांच्या सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होणाऱ्या प्रवासाशी निगडित असल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज अधोरेखित होत आहे.