

माणगाव: आषाढी आणि कार्तिकी एकादशी म्हटली की विठुरायाच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गक्रमण करतात. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विठ्ठलनामाचा गजर करत चालणाऱ्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी अन्नदान, पाणी, औषधोपचार आणि विश्रांतीची व्यवस्था केली जाते. ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीतील माणुसकी, श्रद्धा आणि सेवाभावाचे सुंदर दर्शन आहे.
मात्र, याच पवित्र श्रद्धेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार माणगाव परिसरात वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. भगवी कफणी, गळ्यात मफलर, हातात झेंडा अशा वेशभूषेत काही संशयित व्यक्ती माणगाव एसटी स्थानकासह शहराच्या विविध भागांत फिरून मदतीच्या नावाखाली पैसे मागताना दिसत आहेत.
या व्यक्तींच्या हालचालींबाबत संशय व्यक्त केला जात असून, काही जणांकडून त्यांना रोजंदारीवर ठेवून पैसे गोळा करण्याचे काम दिले जात असल्याची माहितीही समोर येत आहे. कथितपणे दिवसअखेरीस जमा झालेल्या रकमेतून संबंधित व्यक्तीला ठरावीक मोबदला दिला जातो आणि त्यांचे कार्यक्षेत्रही निश्चित असते, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. या प्रकारांची सत्यता तपासून पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
माणगाव एसटी स्थानकात बसमध्ये चढताना किंवा उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्यांबाबतही नागरिकांमध्ये भीती आहे. अशा टोळ्यांमध्ये तीन ते चार जणांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. एकाने दागिना चोरल्यानंतर तो क्षणार्धात दुसऱ्या साथीदाराकडे आणि तेथून तिसऱ्याकडे दिला जातो. त्यामुळे पोलिसांनी संशयिताला पकडले तरी त्याच्याकडे चोरीचा मुद्देमाल सापडत नाही, अशी चोरीची पद्धत असल्याची माहिती समोर येत आहे.
माणगाव शहर आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धार्मिक वेशभूषेचा आधार घेऊन मदतीच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्या संशयित व्यक्तींची चौकशी करावी, चोरीच्या घटनांमागील टोळ्यांचा शोध घ्यावा आणि नागरिकांना निर्भय वातावरण मिळवून द्यावे, अशी मागणी होत आहे.
विठ्ठलभक्तीच्या नावाखाली श्रद्धेची फसवणूक होऊ नये आणि सामान्य माणसाच्या कष्टाच्या कमाईवर चोरट्यांची नजर पडू नये, यासाठी पोलिसांची सतर्कता आणि नागरिकांचे सहकार्य या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. माणगावकरांना सुरक्षिततेचा दिलासा मिळावा, हीच अपेक्षा!
ज्योतिषाच्या नावाखाली फसवणूक
सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत घरात प्रवेश मिळवून दागिने लंपास करण्याचे प्रकारही नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. त्याचप्रमाणे अंगावर चिखल किंवा घाण उडाली आहे, पुढे अपघात झाला आहे, मारामारी किंवा दंगल सुरू आहे, अशी खोटी माहिती देऊन नागरिकांचे लक्ष विचलित केले जाते आणि त्या संधीचा फायदा घेत अंगावरील दागिने व पैसे चोरण्याचे प्रकार घडू शकतात.
मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पसार होण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. ज्योतिष पाहण्याच्या किंवा भविष्य सांगण्याच्या नावाखाली नागरिकांना आर्थिक गंडा घालणाऱ्या भोंदू व्यक्तींपासूनही सावध राहण्याची गरज आहे.
बंद घरांवर चोरट्यांची नजर!
सुट्टीचे दिवस, सण-समारंभ किंवा कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. घराच्या दरवाजाचे कुलूप किंवा कडी कटावणीसारख्या साधनांनी तोडून घरफोडी केली जात असल्याचे सांगण्यात येते. भंगार गोळा करणारे किंवा विविध वस्तू विकण्याच्या बहाण्याने घराघरांत फिरणारे काही संशयित दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री चोरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अशा प्रत्येक व्यक्तीकडे संशयाने पाहण्याऐवजी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे.
श्रद्धा जपा; पण सावधगिरीही बाळगा!
वारकरी, साधू-संत आणि धार्मिक वेशभूषेतील प्रत्येक व्यक्ती संशयित नसते. वारकरी परंपरेचा आदर राखतानाच तिच्या नावाखाली गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे. श्रद्धा ही माणसाला माणुसकीशी जोडणारी शक्ती आहे; मात्र त्याच श्रद्धेचा वापर करून सामान्य नागरिकांची फसवणूक होत असेल, तर अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे. माणगाव पोलिसांनी यापूर्वी अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावून आरोपींवर कारवाई केली आहे.
नागरिकांनीही अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना, दागिने पॉलिश करण्यासाठी देताना तसेच गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना काळजी घ्यावी. संशयास्पद हालचाली, व्यक्ती किंवा वाहनांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी. घर बंद करून बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी आणि शक्य असल्यास सीसीटीव्हीची व्यवस्था करावी.
सुट्टीचे दिवस, सण-समारंभ किंवा कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. घराच्या दरवाजाचे कुलूप किंवा कडी कटावणीसारख्या साधनांनी तोडून घरफोडी केली जात असल्याचे सांगण्यात येते. भंगार गोळा करणारे किंवा विविध वस्तू विकण्याच्या बहाण्याने घराघरांत फिरणारे काही संशयित दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री चोरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अशा प्रत्येक व्यक्तीकडे संशयाने पाहण्याऐवजी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे.