

कोलाड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरून मुंबई, ठाणे, तसेच पुणे येथून उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक तसेच कोकणवासी कोकणात निघाले आहेत. परंतु खांब कोलाडपासून इंदापूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून गेल्या नऊ दिवसांपासून हीच परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे ‘रोज मरे त्याला कोण रडे’, अशी अवस्था दिसून येत असून ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भर उन्हात उभे राहून रायगड पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
शुक्रवार 1 मे पासून उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यामुळे गर्मीने हैराण झालेले मुंबई, ठाणे, पुण्यातील नागरिक तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पर्यटक तसेच कोकणवासी उन्हाळ्यात गारवा मिळविण्यासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील समुद्रावर जाण्यासाठी मुंबई-गोवा हायवेवरून एसटीबस, फोर व्हिलर, रिक्षा, टू व्हीलर, तसेच इतर वाहनांनी कोकणात निघाले आहेत. परंतु मुंबई-गोवा हायवेवरील अपूर्ण कामांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अठरा वर्षांपासून सुरु आहे. परंतु हे काम काही केल्या पूर्ण होईना. लोकनेत्यांकडून फक्त ‘तारीख पे तारीख’ दिल्या जात आहेत. आता नवीन डेडलाईन मे अखेरची दिली आहे. पण हे काम पूर्ण होईल असे कामाच्या परिस्थितीवरून दिसून येत नाही.
जणू डेडलाईनची पद्धत ‘लांडगा आला रे आला’, अशी झाली आहे. कारण लोकांना गणपती, होळी व उन्हाळी सुट्टीत प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वर्ग हैराण झाला असून या कोंडीपासून कधी सुटका होणार? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.