

कमलाकर होवाळ
माणगाव: माणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन दिवसांच्या समाधानकारक पावसामुळे भातशेतीला मोठा दिलासा मिळाला होता. या पावसामुळे भाताच्या रोपवाटिकांना नवसंजीवनी मिळाली असून अनेक शेतांमधील तरवे हिरवीगार आणि तजेलदार दिसू लागली आहेत.
त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने भात लागवडीची कामे पुन्हा ठप्प झाली असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
माणगाव तालुक्यातील बहुतांश भागात भात हे प्रमुख पीक असल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था खरीप हंगामावर अवलंबून असते. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. प्रारंभी अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने रोपवाटिकांच्या वाढीबाबत चिंता निर्माण झाली होती.
मात्र दोन दिवस झालेल्या चांगल्या पावसामुळे भाताची रोपे जोमाने वाढू लागली आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या रोपवाटिकांमध्ये भाताची रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत.
मात्र लागवडीसाठी आवश्यक असलेले पाणी शेतांमध्ये साचत नसल्याने प्रत्यक्ष भात लागवडीच्या कामाला सुरुवात करता आलेली नाही. शेतांमध्ये चिखल तयार होण्यासाठी आणि पाण्याची पातळी स्थिर राहण्यासाठी सातत्यपूर्ण पावसाची गरज असते. परंतु सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे नांगरणी, चिखलणी आणि अंतिम मशागतीची कामे रखडली आहेत.
माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील काही दिवसांतील पावसाकडे लागले आहे. येत्या काळात समाधानकारक आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यास भात लागवडीच्या कामांना वेग येईल तसेच खरीप हंगाम सुरळीत मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या मात्र हिरवीगार झालेल्या तरव्यांकडे आशेने पाहत शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
पीक वाढीवर हवामानातील बदलांचा फटका
आकाशात ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. वेळेत दमदार पाऊस झाला नाही तर लागवड उशिरा होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. लागवडीचा कालावधी पुढे ढकलल्यास पीक वाढीच्या टप्प्यावर हवामानातील बदलांचा फटका बसण्याची भीती कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.