

माणगाव: गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदा माणगाव बायपासच्या रूपाने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा महामार्गाच्या कामांमुळे माणगाव शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी माणगाव–इंदापूर बायपासची किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.
कळमजे नदी जवळील गार्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक २१ दिवसांचा क्युरिंग कालावधी पूर्ण करून १५ सप्टेंबरनंतर कळमजे पुलापासून पुढील बायपास मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.
महामार्गावरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी माणगावच्या शासकीय विश्रामगृहात खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, जलद आणि सुरळीत व्हावा, यासाठी महामार्गावरील प्रलंबित कामे, वाहतूक नियोजन, अपघात प्रवण ठिकाणे, पर्यायी मार्ग, रस्त्यांची दुरुस्ती आणि टोलच्या प्रश्नावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
माणगाव बायपासकडे कोकण वासीयांचे लक्ष
माणगाव–इंदापूर बायपास हा गणेशोत्सवाच्या काळात माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे बायपासची किमान एक मार्गिका सुरू करण्यासाठी कामांना वेग देण्यात आला आहे.
माणगाव–निजामपूर पुलापासून एक लेन सुरू करण्याचे नियोजन असून, कळमजे नदीजवळ गार्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर २१ दिवसांचा क्युरिंग कालावधी आवश्यक आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर १५ सप्टेंबरनंतर कळमजे ते पुढील बायपास मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी माहिती खा. सुनील तटकरे यांनी दिली.
नागोठणे, सुकेळी, कोलाड आणि माणगाव परिसरातील मुंबई–गोवा महामार्गा वरील खड्डे बुजवण्या साठी वापरण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉकच्या कामाच्या दर्जावर मंत्री आदिती तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर तातडीने थांबवून आधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक टिकाऊ साहित्याचा वापर करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असताना पेव्हर ब्लॉक काही दिवसांतच उखडून रस्ता पुन्हा खराब होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पेव्हर ब्लॉकचा वापर अंतर्गत गाव रस्त्यांसाठी उपयुक्त असला तरी राष्ट्रीय महामार्गासारख्या जड वाहतुकीच्या मार्गावर त्याचा वापर करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम केवळ तात्पुरते न करता टिकाऊ पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सुकेळी टोल नाका सध्या सुरू होणार नाही
महामार्गावरील टोलच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. सुकेळी येथील टोल नाका सध्या सुरू करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच खारपाडा ते इंदापूर या मार्गाचे काम पूर्ण क्षमतेने झालेले नसताना टोल आकारण्यास विरोध करण्यात आला.
महामार्गाची कामे अपूर्ण असताना वाहन चालका कडून टोल वसूल करणे योग्य नसल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. टोलच्या अंतरासंदर्भातही नाराजी व्यक्त करण्यात आली असून केंद्र सरकारच्या नवीन टोल धोरणामुळे भविष्यात नागरिकांवरील टोलचा भार कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ताम्हिणी घाटाला बोगद्याचा पर्याय
पुणे–दिघी बंदर मार्गाच्या दृष्टीने ताम्हिणी घाट अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र मुसळधार पावसामुळे घाटातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत असल्याने पुणे आणि कोकण यांच्यातील दळणवळणावर त्याचा थेट परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ताम्हिणी घाटातील समस्येचा मुद्दा मांडण्यात आला.
घाटातील सध्याची दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र भविष्यात रस्ता वारंवार बंद होण्याची समस्या टाळण्या साठी ताम्हिणी घाट परिसरात सुमारे १० किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडण्यात आला आहे.
या बोगद्या मुळे घाटातील धोकादायक वळणे टाळता येतील, प्रवासाचे अंतर व वेळ कमी होईल आणि पुणे–कोकण वाहतुकीला अधिक सुरक्षित व वेगवान पर्याय उपलब्ध होईल. या प्रस्तावाचा तातडीने तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्याने या प्रकल्पा बाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून लाखो वाहने कोकणात दाखल होतात. या काळात महामार्गाच्या कडेला होणारे अनधिकृत पार्किंग वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरते. त्यामुळे व्यापारी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी महामार्गावर वाहने उभी न करता उपलब्ध पर्यायी पार्किंगच्या जागांचा वापर करावा.
- खा. सुनील तटकरे, खासदार