

माथेरान ः मिलिंद कदम
माथेरानमध्ये दरवर्षी उच्चांकी पाऊस पडतो, परंतु मे महिन्याचा पर्यटन हंगाम सुरू होता माथेरानमध्ये दरवर्षी पाणीटंचाईचे सावट उभे असते. माथेरानच्या पाण्यावरती मोरबे धरण सुद्धा उभे आहे . परंतु त्याचा काहीही फायदा माथेरानकरांना होत नसतो, त्यामुळे माथेरानला कायमस्वरूपी पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याकरिता जल प्राधिकरणाने यावर्षी तरी उपाययोजना करणे गरजेचे आहे,अशी मागणी आतापासूनच जोर धरु लागलेली आहे.
माथेरानसाठी नेरळ येथून उल्हास नदी वरती पंपिंग स्टेशन बांधून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या मार्गावर नेरळ, जुम्मापट्टी, वॉटर पाईप व माथेरान असे चार पंपिंग स्टेशन आहे. परंतु या पंपिंग स्टेशनची आता दुरवस्था सुरू झाल्याचेच चित्र दरवर्षी पहावयास मिळते. ठिकाणी वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असतो तर पंपही ऐन पर्यटन हंगामामध्येच बिघडण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढले आहे त्यामुळेच पर्यटन हंगाम सुरू होताच माथेरानला पाणीटंचाईस सामोरे जावे लागते.
या ठिकाणी चे पंपिंग स्टेशन शेवटची घटका मोजत आहे या पंपिंगसाठी असणारे जनरेटर बंद पडून केव्हाच गंजले आहे.परंतु ते सुरू करण्याची मानसिकता जलप्राधिकरणाकडे नाही. त्यामुळेच येणार्या पर्यटन हंगाम लक्षात घेता आतापासूनच या पंपिंग स्टेशनच्या सर्व त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. यावर्षी तरी सर्व पंपिंग स्टेशनला नवीन पंप घेणे गरजेचे आहे.
माथेरान मधील जल प्राधिकरण जिल्ह्यातील सर्वात जास्त कमाई करणारे कार्यालय असल्याचे नेहमी सिद्ध झालेले आहे. तरीही याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने माथेरानमधील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याविरुद्ध माथेरान मधील भाजपा अध्यक्ष प्रवीण सकपाळ जन आंदोलन करून अधिकार्यांना जाब विचारण्याच्या तयारीमध्ये आहे. तशा प्रकारची निवेदन त्यांनी तयार केले असून लवकरच पनवेल येथील अभियंत्यकडे सुपूर्द करणार आहेत.
शार्लेट तलाव जीर्ण
माथेरानमध्ये जलप्राधिकरणाच्या मालकीचा शार्लेट लेक हा तलाव आहे. परंतु हा तलाव आता जीर्ण झाला असून अनेक ठिकाणी यातून पाणी बाहेर पडत असते. दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपाची डागडुगी करून हे थांबवणचा केविलवाणा प्रयत्न जलप्राधिकरण करत असते परंतु या ठिकाणी केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे या धरणातील गाळ गेल्या अनेक वर्षापासून काढला गेला नाही त्यामुळे पंधरा ते वीस फूट गाळ यामध्ये साचला गेल्याचे स्थानिक गावकर्यांचे म्हणणे आहे त्यामुळे हा तलाव स्वच्छ होणे ही काळाची गरज आहे.
माथेरानमधील पाणी पुरवठा येणार्या पर्यटन हंगामामध्ये सुरळीत रहावा या करिता नगरपालिके मार्फत जलप्राधिकरण अधिकार्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढला जाईल .
राहुल इंगळे, मुख्याधिकारी माथेरान