APEDA Bharati Program : 'अपेडा'च्या'भारती'कार्यक्रमात महाराष्ट्राचा डंका

अंजिर, जांभूळ रसासह इंद्रायणी तांदळाची अमेरिका, यूकेला यशस्वी निर्यात
APEDA Bharati Program
'अपेडा'च्या'भारती'कार्यक्रमात महाराष्ट्राचा डंकाpudhari photo
Published on
Updated on

रायगड : जयंत धुळप

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा)सुरू केलेल्या 'भारती' या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे संपन्न झाला आहे.

देशाच्या कृषी-अन्न उत्पादनांच्या निर्यातीत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाला गती देण्यासाठी आयोजित या उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील स्टार्टअप्स आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (एफपीसी)अंजीर आणि जांभूळ रसाची अमेरिका आणि युनायटेड किंगडमला (यूके) यशस्वी निर्यात केली आहे तर महाराष्ट्रात प्रामुख्याने पिकवल्या जाणाऱ्या आणि सुवासासाठी प्रसिद्ध असलेल्या इंद्रायणी तांदळाच्या जातीलाही या उपक्रमाच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ मिळाली आहे.

APEDA Bharati Program
Kolhapuri chappal | कोल्हापुरी चप्पल आता न्यूझीलंडमध्येही मिळणार

'जीआय-टॅग' उत्पादनांना जागतिक पसंती

'भारती' उपक्रमांतर्गत मिळालेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेत महाराष्ट्रातील एका शेतकरी उत्पादक कंपनीने राज्याची मान जागतिक पातळीवर उंचावली आहे. या कंपनीने महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण जीआय-टॅग (भौगोलिक मानांकन) प्राप्त अंजीर रस आणि जांभूळ-आधारित रसाचे सुमारे ८५० किलो उत्पादन अमेरिका (यूएसए) आणि युनायटेड किंगडम (यूके) सारख्या विकसित देशांमध्ये यशस्वीपणे निर्यात केले आहे. उत्पादनांच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, याच बाजारपेठेतून आणखी १.२५ मेट्रिक टन रसाची पुन्हा ऑर्डर या कंपनीला प्राप्त झाली आहे.

इंद्रायणी तांदळाची परदेशात चव

महाराष्ट्रात प्रामुख्याने पिकवल्या जाणाऱ्या आणि सुवासासाठी प्रसिद्ध असलेल्या इंद्रायणी तांदळाच्या जातीलाही या उपक्रमाच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ मिळाली आहे. कर्नाटकस्थित एका स्टार्टअपच्या नेटवर्कद्वारे, ज्यामध्ये १२ राज्यांतील १६०० हून अधिक शेतकरी जोडलेले आहेत, इंद्रायणीसारख्या जीआय-टॅग असलेल्या स्थानिक तांदळाच्या जातींसह ४० मेट्रिक टन सेंद्रिय उत्पादने संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि युरोपियन युनियनच्या (इयू) बाजारपेठेत पाठवण्यात आली आहेत.

कठोर निवड प्रक्रिया आणि सर्वसमावेशक सहभाग

देशभरातून आलेल्या ७०० हून अधिक अर्जांमधून २२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०० उत्कृष्ट स्टार्टअप्सची बहुस्तरीय प्रक्रियेद्वारे या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये १७ ते ७५ वर्षे वयोगटातील उद्योजकांचा समावेश होता, जे भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेतील विविधता आणि चैतन्य दर्शवणारे ठरले आहे.

निर्यात सज्जतेसाठी विशेष प्रशिक्षण

निवडलेल्या स्टार्टअप्सना १२० तासांचे संरचित, निर्यात-केंद्रित 'ॲक्सलरेशन' प्रशिक्षण देण्यात आले. यात निर्यात सज्जता, बाजारपेठ प्रवेश, व्यवसाय विस्तार, आंतरराष्ट्रीय नियम, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि गुंतवणूकदारांशी जोडण्याची संधी देण्यात आली.

APEDA Bharati Program
American power politics | अमेरिकन सत्ताकारणाचा जागतिक संदर्भ

दुबईतील 'गल्फूड २०२६' मध्ये थेट जागतिक प्रवेश

या उपक्रमाचा एक भाग म्हणून अपेडाने दुबईतील 'गल्फूड २०२६' या जगातील सर्वात मोठ्या अन्न आणि पेय व्यापार प्रदर्शनात भारतातील ८ प्रमुख स्टार्टअप्सच्या सहभागाला सहाय्य केले. या माध्यमातून स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी यांच्यात १०० हून अधिक बी२बी((बिज़नेस-टू-बिज़नेस) बैठका पार पडल्या, ज्यामुळे जागतिक खरेदीदारांशी थेट संपर्क साधणे सुलभ झाले.

काय आहे 'भारती' कार्यक्रम आणि त्याचे उद्दिष्ट

'भारती' या कार्यक्रमाचे पूर्ण नाव भारत'ज हब फॉर ॲग्रीटेक, रेझिलियन्स, ॲडव्हान्समेंट अँड इन्क्युबेशन फॉर एक्सपोर्ट इनोव्हेशन असे आहे. वर्ष २०३० पर्यंत 'अपेडा' निर्धारित उत्पादनांमध्ये ५० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी निर्यात साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट असून, त्या दृष्टीने ही एक गतिमान परिसंस्था केंद्र सरकारकडून विकसित केली जात आहे.

महाराष्ट्रातील कृषी-उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत संधी

पहिल्या टप्प्याच्या अभूतपूर्व यशानंतर, ज्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील स्टार्टअप्सनी आंबा, भरडधान्ये (मिलेट्स) आणि सेंद्रिय उत्पादनांची सिंगापूर, न्यूझीलंड आणि दुबई येथे यशस्वी निर्यात केली आहे, 'अपेडा' लवकरच 'भारती' कार्यक्रमाचा पुढील टप्पा सुरू करणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील आगामी कृषी-उद्योजकांना आणि स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेत झेप घेण्यासाठी आणखी मोठे आणि व्यापक पाठबळ उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news