

नाते : ईलयास ढोकले
महाड तालुका हद्दीत वरंडोली येथे अक्षय कन्स्ट्रक्शन रायगड रोड येथील ठेकेदाराच्या मालकीच्या एका कारमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. सदर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या सचिन परशुराम दळवी राहणार वरंडोली यांच्या रहिवासी घरावर कार आदळली. या अपघातात घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायगड रोडवरून वेगाने येणाऱ्या झायलो कार क्रमांक 06 9433 या कारचा चालक अचानक नियंत्रण गमावून थेट वारंडोली गावातील घराच्या बाहेरील असलेल्या अंगणातील भिंतीवर आदळला. जोरदार धडकेत घराची भिंत, अंगणातील मंडप,दरवाजा तसेच घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. अपघाताच्या वेळी घरात कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मात्र प्रसंगावधानामुळे ते थोडक्यात बचावले.संबंधित वाहनचालक नशे मध्ये असल्याचा संशय या संबंधित ग्रामस्थांकडून करण्यात आला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.कार मोठ्या प्रमाणात खराब झाली असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, संबंधित ठेकेदाराने नुकसानग्रस्त कुटुंबाला योग्य ती भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच रायगड रोडवर अक्षय कन्स्ट्रक्शनच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे खूप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे यांचे डंपरचे वाहक खूप वेगाने गाड्या चालवत असतात व यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे व अपघाताला ही समोर जावं लागत आहे. या अनुषंगाने वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणीही या घटनेनंतर जोर धरू लागली आहे.