

भिवंडी : भिवंडीमध्ये अल्पवयीनांच्या अपहरणाच्या घटना सुरूच आहेत. त्यातच दोन दिवसांत शहराच्या वेगवेगळ्या भागातून चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.पहिल्या घटनेत 16 वर्षीय 3 महिन्यांची मुलगी आईला पाणीपुरी खाऊन येते, असे सांगून घरातून 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता निघून गेली असता ती परत घरी न आल्याने तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही. त्यामुळे तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून पळवून नेल्याच्या संशयातून आईच्या तक्रारीवरून अज्ञातावर शांतीनगर पोलीस ठाण्यात 24 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवार 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी तिच्या कुटुंबाला न कळवता घराबाहेर गेली असता बेपत्ता झाली. मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केल्याचा कुटुंबाचा संशय असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तिसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 15 वर्षीय मुलगी 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता नैसर्गिक विधीला जाते, असे सांगून 20 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता घराबाहेर पडली आणि परत आली नाही. खूप शोध घेऊनही मुलगी सापडली नाही तेव्हा कुटुंबाने 24 डिसेंबर रोजी अज्ञाताच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
तर भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा 15 वर्षीय नऊ महिन्यांचा अल्पवयीन मुलगा 24 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता ट्यूशनला जाण्यासाठी घराबाहेर पडला, पण तो घरी परतला नाही. खूप शोध घेतल्यानंतरही कुटुंबाला मुलाचा कोणताही पत्ता न लागल्याने कोणीतरी अज्ञाताने मुलाच्या बालपणाचा फायदा घेत मुलाचे अपहरण केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली आहे.
बेपत्ता मुलांची संख्या वाढतीच...
या सर्व घटनांमध्ये पोलिसांनी मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पूर्ण ताकदीने त्यांचा शोध सुरू केला आहे. परंतु शहरात बेपत्ता होणाऱ्या मुलांची वाढती संख्या आणि वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.