

महाड ः श्रीकृष्ण बाळ
सन 2021 नंतर प्रशासकीय राजवट असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर 26 जानेवारी पूर्वी निवडणुका घेणे संदर्भात शासनाकडून करण्यात आलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील राजकीय पक्षांमध्ये आता कार्यकर्त्यांमधील वातावरण गरम होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र अनुभवास येत आहे.
मागील चार वर्षात निवडणुका झाल्या नसल्याने सर्वपक्षीय राज्यकर्त्यांमध्ये त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. मात्र आता सर्व संबंधित राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या बरोबरच काम करण्याबाबत दिलेल्या सूचना लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाड तालुक्यात मातीत निवडणुकापर्यंत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत जनतेने अनुभवली होती . मात्र मागील चार वर्षात या दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या उभ्या फुटींमुळे या दोन पक्षांचे झालेले चार पक्ष तसेच भारतीय जनता पक्षाची ज्या संदर्भातील भूमिका निर्णायक ठरली आहे. रायगड जिल्ह्याचा विचार करता काही काळापर्यंत एक छत्री अंमल गाजविणारे शेतकरी कामगार पक्षाच्या संदर्भात या पक्षावर आलेली माघारीची नामुष्की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पक्ष नेतृत्वाला पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा एकदा उभी करण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे.
निवडणुकांसंदर्भातील केवळ आरक्षण जाहीर झाल्यानंतरच प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये सुरुवात झालेली निवडणूक लढवण्याची स्पर्धा लक्षात घेता गेल्या पंधरा दिवसात या प्रमुख राजकीय पक्षांच्या प्राथमिक बैठका प्रत्येक विभागातून संपन्न झाल्याची माहिती हाती आली आहे. सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे लढविण्याबाबत प्राथमिक स्तरावरूनच सुरू केलेली तयारी लक्षात घेता आगामी निवडणुका या महाड तालुक्यात बहुरंगी होतील की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.
प्रत्येक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याकडूनच सुरुवात झालेली संपर्काची मोहीम व महाड मधील नागरिकांच्या असलेल्या मतदारसंघातील नोंदी बाबत सुरू झालेली पाहणी लक्षात घेता आगामी निवडणुकांसाठी महाड मतदार संघात वातावरणातील तापमानाबरोबरच राजकीय वातावरण गरम होऊ लागल्याचे स्पष्ट चित्र अनुभवास येत आहे. यामुळेच आगामी दोन ते तीन महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांकरता या आघाडी व युतीमधील निवडणुका कशा पद्धतीने संपन्न होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मविआ विरुद्ध महायुती लढत
मागील दोन वर्षात राज्यात झालेले राजकीय पक्षांमधील विभाजन व त्याचा दिसून आलेला राजकीय परिणाम हा तत्वाला धरून आहे किंवा कसे या संदर्भात स्वतंत्र मते लक्षात घेतल्यानंतरही राज्यात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होईल असा असलेला प्राथमिक अंदाज महाडमध्ये सध्या तरी बाजूला पडल्याचे दिसून येते.