

अंबरनाथ : महाराष्ट्र राज्यातील भव्य आणि विस्तृत म्हणता येईल असं अंबरनाथ शहरातील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर लोकार्पण निमित्त खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आयोजित आठ नाटकांच्या नाट्य महोत्सवात सलग पाचव्या दिवशी नाट्यमंदिर हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. इतकेच नाही तर 22 ऑक्टोबर रोजी, विजय तेंडुलकरांचे, सखाराम बाईंडर सादर झाले. यावेळी 650 आसनक्षमतेच्या नाट्यगृहात जवळपास एक हजार प्रेक्षक खाली बसून, उभं राहून नाटकाचा अनुभव घेत होते.
दीपावलीच्या पूर्व संध्येला अर्थात 19 ऑक्टोबर रोजी अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पद्मश्री अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दिवाळी निमित्ताने रसिकांना नाट्य कलेचा आनंद लुटला यावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथकर रसिक प्रेक्षकांसाठी सलग आठ दिवस नाट्य महोत्सव निमित्ताने, सही रे सही, करून गेलो गाव, आजी बाई जोरात, सखाराम बाईंडर, संगीत देवभाबळी, मी वर्सेस मी, पुरुष अशी नाटके सादर होत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक नाटक हाऊसफुल्ल होत असल्याने नाट्य कलाकारांचा उत्साह द्विगुणीत होत आहे.
खुर्च्यांवर जागा न मिळाल्याने जमिनीवर बसून पाहिले नाटक
केवळ अंबरनाथकरच नाही तर बदलापूर, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातूनही शेकडो नाट्यरसिक या नाट्यगृहाला भेट देण्यासाठी आणि प्रयोग पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यात दिवाळी निमित्त सुट्यांचा काळ असल्याने नाट्यगृहाचा पडदा उघडल्यापासून रोज नाट्यरसिक नाटकांचे प्रयोग हाऊसफुल करत आहेत. तर करून गेलो गाव, सखाराम बाईंडर आणि देव बांभळी हे नाट्य प्रयोग पाहण्यासाठी तर शेकडो नाट्यरसिकांनी खुर्च्यांवर जागा न मिळाल्याने जमिनीवर बसून आणि दरवाज्यांमध्ये तीन तास उभे राहून शिट्या, टाळ्यां वाजवत नाटकांचा आनंद घेतला आहे.