

महाड : श्रीकृष्ण बाळ
महाड नगरपरिषदेच्या सन 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवार, 8 ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालयात पार पडला. या सोडतीस महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे तसेच मुख्याधिकारी धनंजय कोळेकर उपस्थित होते.
महाड शहरातील 10 प्रभागांमधील 20 नगरसेवक पदांसाठी ही आरक्षण सोडत घेण्यात आली. एकूण 50 टक्के महिला आरक्षणाच्या अधीन राहून प्रभाग 1, 2, 7, 8, 9 आणि 10 हे सर्वसाधारण (महिला) तर प्रभाग 3 अनुसूचित जाती (महिला), तसेच प्रभाग 4, 5, 6 नामप्र (ओबीसी - महिला) अशा प्रकारे 10 महिला उमेदवारांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
उर्वरित 10 जागांपैकी प्रभाग 1 आणि 10 साठी नामप्र (ओबीसी), तर इतर 8 प्रभाग सर्वसाधारण उमेदवारांसाठी खुला राहणार आहेत. या आरक्षणासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धी 9 ऑक्टोबर रोजी प्रशासनामार्फत करण्यात येणार असून 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण याआधीच जाहीर झाले असून त्यानंतर आता महाडमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे माजी नगराध्यक्ष सुदेश कळमकर, शिवसेना (शिंदे गट) कडून माजी नगरसेवक नितीन पावले तसेच माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून चेतन उर्फ बंटी पोटफोडे, व शहर प्रमुख मंगेश देवरुखकर यांच्या नावांची चर्चा शहरभर रंग घेत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला तणाव सर्वश्रुत असल्याने, या दोन्ही गटांमध्ये समन्वय होण्याची शक्यता क्षीण मानली जात आहे. अशा स्थितीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरू शकते.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हामुणकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नीला स्नेहल जगताप यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती, मात्र अल्प मताधिक्याने स्नेहल जगताप विजयी झाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी जगताप कुटुंबीयांचा चेहरा नसल्याने, बिपिन म्हामुणकर पुन्हा पत्नीला उमेदवारी देण्याबाबत राजकीय चातुर्याने खेळी करतील का? अशा चर्चा देखील आता रंगू लागल्या आहेत.
एकंदरीत या पार्श्वभूमीवर आता महाड नगरपरिषद निवडणूक प्रत्येक दिवसागणिक रंगतदार अवस्थेत येणार असून कोण कोणाला शह-काटशह देतो, हे पाहणे आगामी काही दिवसांत उत्सुकतेचे ठरणार आहे. राज्याच्या राजकारणात महाडचे महत्व वेगळे आहे. त्यामुळे येथील घडामोडींवर सर्वांचेच लक्ष राहणार आहे.
आता महाड नगरपरिषद निवडणूक प्रत्येक दिवसागणिक रंगतदार अवस्थेत येणार असून कोण कोणाला शह-काटशह देतो, हे पाहणे आगामी काही दिवसांत उत्सुकतेचे ठरणार आहे. राज्याच्या राजकारणात महाडचे महत्व वेगळे आहे. त्यामुळे येथील घडामोडींवर सर्वांचेच लक्ष राहणार आहे.