

महाड : श्रीकृष्ण बाळ
दीडशे वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या ऐतिहासिक महाड नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महानगर परिषदेच्या मागील पन्नास वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतला असता स्वर्गवासी दादासाहेब सावंत क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित शहराचे शिल्पकार म्हणून गौरविले गेलेले स्वर्गवासी ॲड. अण्णासाहेब सावंत यांसह विविध मान्यवरांनी आपल्या कालखंडामध्ये केलेल्या शहराच्या विकासात्मक कामाची महती आजही नागरिकांकडून गौरविली जाते.
या पार्श्वभूमीवर या मान्यवरांनी भूषवलेल्या आसनावर आगामी महिन्याभरात नव्या दमाचे नवीन पिढीचे शिलेदार निवडले जातील असे स्पष्ट संकेत सर्व पक्षांतील सध्या सुरू असलेल्या मुलाखतीमधून समोर येत आहेत .राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष या तीन प्रमुख पक्षांमध्ये सध्या महाडच्या राजकारणाची सूत्रे फिरत असून कोणते दोन पक्ष एकत्र येणार याकडे तमाम महाडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
या तिन्ही पक्षांतील सध्या सुरू असलेल्या मुलाखतींच्या कार्यक्रमाला दरम्यान प्राप्त झालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार ज्येष्ठ नागरिकांची उमेदवारी अभावाने दिसून येत असून सर्व पक्षाकडून तरुण उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
निवडून येण्याचे मेरीट हे प्रत्येक पक्षाकडून पाळले जात असून एकूण 20 सदस्यांपैकी किमान 12 ते 14 सदस्य हे तरुण व प्रथमतः निवडणूक लढवणारे असतील अशी शक्यता आता या पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
देशाच्या स्वातंत्रतेचा हीरक महोत्सव सुरू असताना आगामी दोन वर्षात चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी वर्ष महोत्सव येत आहे हे लक्षात घेता आगामी काळात महाड नगरपरिषदेकडून शहराच्या विविध भागात विकासात्मक कामाबरोबरच चवदार तळे सत्याग्रह करता विशेष लक्ष दिले जाईल हे स्पष्ट झाले आहे.
शहराच्या मागील पाच दशकांच्या विकासात्मक कामाचा आढावा घेताना शहराच्या नवीन वाढत्या गरजा लक्षात घेऊन नगर विकास खात्याकडून परवानगी घेऊन शहराच्या मोकळ्या असलेल्या जागांमध्ये नव्याने निर्मिती करण्याबाबत येणारी लोकप्रतिनिधी प्राध्यान्याने लक्ष देतील असे स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्हयातील अन्य नगरपालिकांमध्येही अधिकाधिक तरुण उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तरुणवर्गामध्ये येणाऱ्या निवडणुकांबाबत उत्सुकता वाढत आहे.
नवोदित सदस्यांची संख्या वाढणार
प्रतिवर्षी आठ ते नऊ कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्पा असणाऱ्या महाड नगर परिषदेमध्ये शासनाच्या विविध योजनांची पूर्तता करतानाच अन्य मार्गाने शासनाच्या तिजोरीतून जास्तीत जास्त निधी महाड शहराच्या विकासाकरता कसा येईल याकडे या लोकप्रतिनिधींना प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. एकूणच महाडच्या इतिहासामध्ये प्रथमच एकूण लोकप्रतिनिधींपैकी 50 टक्के पेक्षा जास्त लोकप्रतिनिधी हे प्रथम निवडून गेलेले व तरुण असतील असे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत.