

महाड ःमागील तीन दशकांपासून महाड नगर परिषदेवर भगवा फडकवण्याची स्वप्न अखेर माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या विजयाने शिवसेनेला शक्य झाले असून या निवडणुकीत सुनील कविस्कर यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी भाजप युतीचे उमेदवार सुदेश कलमकर यांचा 692 मतांनी केलेला पराभव शिवसैनिकांना नवी ऊर्जा व ताकद देणारा ठरला आहे. सुनील कविस्कर यांच्या धुरंदर व राजकीय चातुर्याचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य महाडकर नागरिक व्यक्त करीत आहेत.
निवडणुकीमध्ये एकूण झालेल्या 16,424 मतदानापैकी सुनील कविस्कर यांना 8हजार 91 तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुदेश कलमकर यांना 7399 तर अपक्ष उमेदवार गणेश कारंजकर 301 ,चेतन उर्फ बंटी पोटफोडे 504, व पराग वडके 29 मते प्राप्त करू शकले. या निवडणुकीत एकूण दहा प्रभागापैकी चार प्रभागांमध्ये सुदेश कलमकर तर सहा प्रभागांमध्ये सुनील कविस्कर यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी मध्ये मोठी आघाडी घेतल्याचे आकडेवारीने सिद्ध झाले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुदेश कलमकर यांना प्रभाग एक मध्ये 42 प्रभाग दोन मध्ये73 प्रभाग पाच मध्ये 123 व प्रभाग 10 मध्ये 214 मतांचे मताधिक्य मिळाले तर सुनील कवीस्कर यांनी प्रभाग तीन 77 प्रभाग चार मध्ये391 प्रभाग 6 मध्ये206 प्रभाग 7 मध्ये23 प्रभाग 8 मध्ये 13व प्रभाग 9 मध्ये 172 एवढी मते प्राप्त केली.1991 पासून आपला राजकीय श्री गणेशा करणाऱ्या सुनील कविस्कर यांनी पदार्पणातच अपयशाला सामोरे गेल्यावर त्यानंतर आज झालेल्या सातव्या निवडणुकीमध्ये सातत्याने मोठ्या फरकाने विविध प्रभागातून विजय संपादन केला आहे.
या निवडणुकीत शेवटच्या क्षणी त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आल्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रभागांमध्ये आपला असलेला वैयक्तिक जनसंपर्क परिणाम कारकरीत्या उपयोगात आणून त्या स्नेहसंबंधाच्या जोरावरच शिवसेनेला नगरपरिषदेवर भगवा फडकवून देण्यात अनमोल कामगिरी केली. एकूणच मागील तीन दशकांपासून चातकासारखी वाट पाहणाऱ्या शिवसैनिकांना आजचा हा विजय मनस्वी समाधान व आनंद देणारा असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये याचे सकारात्मक पडसाद शिवसेनेच्या फायद्याच्या बाजूने उमटतील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. महाडनगर परिषदेवर शिवसेनेने स्थापन केलेला भगवा झेंडा आगामी काळात संघटनेला अधिक ताकद देणारा ठरेल हे सिद्ध झाले आहे.