

महाड : मागील दोन दिवसापासून महाड शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात तसेच पोलादपूर व महाबळेश्वर परिसरामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसाने आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास शहरात पाणी शिरले. पुरामुळे शहराच्या सखल भागामध्ये जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. शहराच्या पाच प्रमुख प्रवेशद्वारापैकी तीन प्रवेशद्वार मार्गावर पाणी आल्याने पोलीस प्रशासनाकडून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
किल्ले रायगड मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली आहे. मागील २४ तासात महाबळेश्वर येथे ३३०, पोलादपूर येथे १६१ व महाड येथे १२४ म्हणजे एकूण ७१५ मिलिमीटर पाऊस झाला. १९ वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच महाड तालुक्यात जुई रोहन कोंडीवते दासगाव दुर्घटना घडली होती. महाडमध्ये आलेल्या पुरामुळे आज पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. महाड नगर परिषदेच्या वतीने सकाळी पावणेसहा वाजता सावित्री नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजविण्यात आला. महाडमध्ये नगरपालिकेच्यावतीने सहा ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्मारक, दस्तुरी नाका, वीरेश्वर मंदिर, रमाई विहार, शाळा क्रमांक पाच व नवीन पोलीस वसाहत या भागाचा समावेश आहे.
दरम्यान, १५ जून पासून महाडमध्ये सक्रिय असलेले एनडीआरएफचे पथक सध्या सुरू असलेल्या महापुराच्या संदर्भातील कार्यवाहीवर लक्ष ठेवून आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला तालुक्यातील पूर स्थितीवर लक्ष ठेवून मदत कार्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर व तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.
सावित्री नदीच्या पाण्याने महाड शहरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास प्रवेश केला. महाड शहरामध्ये येणाऱ्या पाच पैकी तीन मार्गावर पाणी आले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी शहरातून असलेल्या मार्गांपैकी नवे नगर एसटी स्टँड व उभा मारुती पंचायत समिती हे सखलभागाच्या वरील भागातील मार्ग सध्या सुरू आहेत. महामार्गावर शहरांतील विविध नागरिकांनी आपल्या मोठ्या गाड्या नेऊन ठेवल्याने या मार्गावरून ही वाहतूक करणे अडचणीचे झाल्याचे दिसून येते. सावित्री नदीच्या पुरामुळे महाड शहराची कोंडी झाल्याचे चित्र आहे.