Maharashtra Rain Live Update : राज्यात पावसाचे धूमशान, 'या' जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट

पुण्‍यात विजेच्‍या धक्‍क्‍याने तिघांचा मृत्यू
Maharashtra Rain Live Update
राज्यात 'या' ठिकाणी रेड अलर्टPudhari

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस राज्यात विविध जिल्‍ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे पुरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Maharashtra Rain Live Update) प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

साताऱ्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर

सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व शाळा महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था मधील विद्यार्थ्यांना उद्या (दि.२६) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

पुण्‍यात विजेच्‍या धक्‍क्‍याने तिघांचा मृत्यू

पुण्यात जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्याला हवामान खात्याने आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी पाणीच-पाणी झाले आहे. आज (दि.२५) पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खाली पाणी पातळी वाढली. पाणी पातळी वाढल्याने तेथील अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी तिघेजण गेले. सुरक्षित ठिकाणी हलवताना अचानक विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला. या तिघांपैकी अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष २५) आणि आकाश विनायक माने (वय वर्ष २१) दोघे पुलाच्या वाडी डेक्कन येथिल रहिवासी असुन शिवा जिदबहादुर परिहार (वय १८) नेपाळी कामगार आहे. शॉक लागल्यानंतर तिघांना नजीकच्या हॉस्पिटल येथे दाखल केले. उपचारांती डॉक्टरांनी मयत घोषित केले.

'या' जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट

मुंबईसह (Mumbai Rain) पालघर, ठाणे, रायगड, पुणे (Pune Rain Updates) सातारा जिल्ह्याला आज (दि.२५ जुलै) अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याला उद्याही २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरला (kolhapur flood update today) उद्या २६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Heavy rain alert in Maharashtra)

ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी

ठाणे जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पावसाने जोर धरला असून उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदी काठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

Kolhapur | राधानगरी धरणाचे ४ दरवाजे उघडले 

राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. ३, ४, ५ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे खुले झाले आहेत. राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात ७,२१२ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. आज दि. २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्र. ५ उघडला होता. नदीकाठच्या लोकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Radhanagari Dam)

Thane |मोडक सागरही तलाव वाहू लागला

ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोडक सागर तलावही आज (दि,२५) सकाळी १०.४० वाजता पूर्ण भरुन वाहू लागला. त्यामुळे आतापर्यंत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावा पैकी चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. मोडक सागर तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे. या तलावातून मुंबईला दररोज सरासरी ४५५ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.

नागरिकांनी सतर्क रहावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यांतील पावसाच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "पुण्यातील रस्त्यांवर आणि लोकांच्या घरात पाणी साचले आहे. खडकवासला धरण आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ., महानगरपालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त तेथे तैनात आहेत. सुरक्षित स्थळी जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून विविध ठिकाणी अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे. कुर्ला आणि घाटकोपर भागात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे, नागरिकांनी सतर्क रहावे."

बचावकार्य वेगाने सुरु - मुख्यमंत्री शिंदे

मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. मात्र, जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथे बचावकार्य वेगाने सुरु आहे. काळजीचे करण्याचे कारण नाही, मात्र नागरिकांनीदेखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकांत समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Mumbai Flood : मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वाऱ्याचा वेग ५०-६० किमी/ताशी राहील.

पालघर मधील शाळांना सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज (दि.२५) पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने  वाडा, विक्रमगड तालुक्यातील पावसाची परिस्थिती पाहता सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय यांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

पुण्यामध्ये एनडीआरएफच्या ३ टीम दाखल

पुण्यामध्ये एनडीआरएफच्या (NDRF -National Disaster Response Force) तीन टीम दाखल झाल्या आहेत. यापैकी एकता नगर आणि सिंहगड रोड येथे दोन पथके तर वारजे येथे एक पथक तैनात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news