

महाड : मागील ७२ तासात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने महाड तालुक्यातील विविध भागातील ११९ कुटुंबातील ४३८ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यादरम्यान १५ दुकाने व सत्तावीस घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान या महापुरामध्ये दोघांना आपले प्राण गमवावे लागल्याचे समजते.
काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा प्रकारामुळे व धोका निर्माण झाल्यामुळे काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये नडगाव बौद्धवाडी, तुडील, राजेवाडी, वरंध आदिवासी वाडी, करंजखोल, मोरेवाडी सिंगरकोंड, साहिल नगर मौजे गांधारपाले, रावतळी, येथील ११९ कुटुंबांचे अर्थात ४३८ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पुराचे पाणी शिरल्याने महाड शहरातील १५ दुकाने व २७ घरांचे नुकसान झाले आहे. तर किंजळघर येथील शैलेंद्र घोसाळकर यांच्या घरात पाणी शिरल्याने घराचे नुकसान झाले आहे व या कुटुंबातील तीन जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मौजे गोंडाळे येथील शेतकरी अमोल अशोक पवार वय 32 यांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरल्याने तीन बोकडांचा मृत्यू झाला आहे.
दरड कोसळून व पुराच्या पाण्यामुळे महाड तालुक्यातील काही मार्ग बंद होऊन गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये महाड ते भोर वरंध घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महाड ते शिरगाव दादली पूल सावित्रीची पातळी ७.७५ मीटरच्या वर गेल्यामुळे पुलावर पाणी येऊन हा पूल वाहतूकस बंद ठेवल्याने विन्हेरे खाडीपट्टा विभागाचा संपर्क तुटला आहे. मांघरुन ते सादोशी रस्त्यावर कातकुंडी जवळ दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. पाचाड ते सांदोशी पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
शिरगाव ते म्हाप्रळ या मार्गावरील रावढळ पुलावर नागेश्वरी नदीचे पाणी आल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सोलमकोंड ते वरचीवाडी येथे दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद होती.
महाड ते दापोली खेड मार्गावरील तुळशी खिंड येथे दरड कोसळल्याने हा देखील मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. गोंडाळे ते कुडवेवाडी रस्त्यावर दरड आल्याने वाहतूक बंद आहे. गेल्या दोन दिवसापासून महाड ते नातेखिंड रायगड मार्गावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती.