

श्रीकृष्ण बाळ
महाड: महाड शहराच्या विकास आराखड्यामध्ये शहराच्या विविध भागात दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेल्या या 17 रस्त्यांपैकी एकही रस्त्याचे लोकार्पण झाले नसल्याचे खात्रीशीर वृत्त चौकशी आणखी समोर आले असून या कामी 93 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे, महाडकर नागरिकांकडून या मंजूर कामांसाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.
महाड शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अंतर्गत रस्ते प्रकल्पाची सध्या शहरभर चर्चा सुरू असून, अनेक नागरिक या कामांच्या सद्यस्थितीकडे पाहून “एक ना धड, भाराभर चिंध्या” अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
जिल्हा विकास आराखड्यांतर्गत शहरातील 17 अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी 93 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ऑक्टोबर 2024 मध्ये या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे, पर्यायी मार्ग निर्माण करणे आणि भविष्यातील नागरी विस्ताराला चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार या सर्व रस्त्यांची कामे सिमेंट काँक्रीट पद्धतीने करण्यात येणार असून संपूर्ण कामाचा ठेका सारडा कन्स्ट्रक्शन, बीड या कंपनीकडे देण्यात आला आहे. तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नगर परिषदेमार्फत मोबदल्याच्या स्वरूपात टीडीआर देण्याची प्रक्रियाही राबविण्यात आली आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि पर्यायी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असला, तरी एकाच वेळी अनेक भागांत कामे सुरू करण्यामागील भूमिका काय, तसेच जवळपास पूर्णत्वाकडे गेलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण का करण्यात आली नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
ठेकेदाराकडे सर्व कामे एकाच वेळी हाताळण्याची क्षमता असणे यात काही गैर नाही,मात्र 17 पैकी किमान दोन ते चार रस्ते जरी पूर्णत्वास गेले असते, तर शहरातील पर्यायी वाहतूक व्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळाला असता, अशी भावना व्यक्त होत आहे.
सध्या सर्वच कामे वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याने कामांचा वेग, अडचणी आणि त्यामागील कारणांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच ठेकेदाराने अशा प्रकारे कामे अर्धवट ठेवण्याचे नेमके कारण काय, याबाबत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून स्पष्ट भूमिका समोर यावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या माहितीनुसार रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित मार्गांवर पथदिव्यांची उभारणी तसेच वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूदही केली जाणार आहे. मात्र सध्या तरी महाडकरांची अपेक्षा एकच आहेपथदिवे आणि वृक्षलागवडीपूर्वी किमान एक-दोन रस्त्यांचे तरी लोकार्पण व्हावे, जेणेकरून महाडच्या दळणवळणाला प्रत्यक्ष पर्याय उपलब्ध होईल.
अनेक रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेतच
नवेनगर, दस्तुरी नाका ते नातेखिंड मार्ग, काकरतळे तसेच शहरातील इतर काही भागांमध्ये या अंतर्गत रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. शहराचा विकासाचा चेहरा बदलणारा प्रकल्प म्हणून सुरुवातीपासूनच या कामांकडे पाहिले जात होते. त्यामुळे नागरिकांमध्येही या प्रकल्पाबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या,मात्र प्रत्यक्षात शहरात दिसणारे चित्र काहीसे वेगळे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
अनेक ठिकाणी कामांना सुरुवात झाली असली, तरी आजपर्यंत एकाही रस्त्याचे लोकार्पण झालेले नाही. काही ठिकाणी रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे दिसते; मात्र ती पूर्ण न करता तसेच ठेवण्यात आल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. तर काही भागांमध्ये कामांची सुरुवात करून ती अर्धवट अवस्थेतच सोडण्यात आल्याचे चित्र आहे